गाव खेड्यातही राजकारणाची स्पर्धा चिंतेचा विषय

0

लोकशाही संपादकीय लेख 

भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात काल एकूण 120 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होऊन निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत आपलेच पॅनल निवडून आले पाहिजे म्हणून प्रचाराची रणधुमाळी खेडेगावात दिसून आली. ग्रामपंचायत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतात कारण त्यावरून सत्तेची समीकरणे पक्ष मांडत असतो. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ही एक मोठी ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात मुक्ताईनगरच्या आमदारांबरोबर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रचार सभा घेतल्या.

केवळ एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असल्याने कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतचा कारभार त्यांच्या हातून हिसकावून आपल्या ताब्यात घेण्यासाठी आमदारांनी दंड थोपटले होते. परंतु काल निकाल त्यांच्या विरोधात गेला. एकूण 17 सदस्य कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचांसह 13 सदस्य एकनाथ खडसे यांचे समर्थक निवडून आले. शिंदे भाजप गटाला एकनाथ खडसे यांचा हा धक्का म्हटला पाहिजे. नुकत्याच पार पाडलेल्या दूध संघाच्या निवडणुकीत विद्यमान नवे चेअरमन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या धर्मपत्नी मावळत्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्याच अविर्भावात आमदार मंगेश चव्हाण यांनी कुऱ्हा काकोडा गावात जाऊन खडसेंच्या ताब्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून किसकाहून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. संघ निवडणुकीत केवळ 447 मतदार असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय क्षेत्राचा सत्तेचा त्याचबरोबर इतर बाबींचा दबाव टाकून मतदान खेचून आणले. ते सत्ताधाऱ्यांना सहज सोपे आहे. मात्र गाव पातळीवरील स्थिती काही वेगळीच असते, हेच कुऱ्हा काकोडा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. आमदारांच्या पदरी पराभव पडला एवढे मात्र निश्चित..

खेडेगावात अजूनही सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. तर शेतीत कामे करून रात्री पारावर एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी केल्या जातात. आजही पारावर गावकऱ्यांच्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यावरून गावातला एकोपा दिसून येतो. तथापि हिडीस राजकारणाचे लोन पोचलेले आहे. परिणामी गटबाजीमुळे त्यांच्यात असलेल्या एकोप्याला तळा जातो. त्यामुळे गावातील राजकारणाच्या स्पर्धेमुळे जणू एकमेकात वैर असल्याचा भाव दिसून येतो. राजकीय पक्षांच्या सर्व वरिष्ठांनी याबाबत एक मत नसून गाव पातळीवरील वातावरण सौदार्हाचे करण्यासाठी तसेच निकोप राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा खेडेगावातील वातावरण दूषित होऊन समाजावर विपरीत परिणाम होईल. जे तालुका जिल्हा व राज्यस्तरावर चालले आहे त्याची पुनरावृत्ती खेडेगावात होत असल्याने ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जामनेर तालुक्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचे वर्चस्व असलेल्या तालुक्यातील एकूण बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मतदार होऊन मतमोजणी झाली.

एकूण बारा ग्रामपंचायती भाजपतर्फे नव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला, असा दावा केला जातो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, पाच जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. या वादाला काही अर्थ नाही. परंतु भाजपच्या अंतर्गतही दोन गट निर्माण होऊन भाजपचे पॅनल निवडून निवडणुकीत आमने सामने निवडणूक लढवत होते. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात भाजपच्या पॅनलचा विजय झाल्यावर ते उमेदवार मिरवणुकीने मंदिरात दर्शनाला जात असताना पराभूत पॅनलच्या लोकांकडून त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत सरपंच पदी विजयी झालेले जितेंद्र यांचे बंधू धनराज माळी यांच्या डोक्याला दगड लागून मृत्यू झाल्याची अफवा पसरवली गेली. मात्र प्रशासनाने याचा खुलासा केला असून सदर व्यक्तीचा मृत्यू हा चक्कर येऊन पडल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे. मात्र भाजपचे एकमेकांमध्ये आपापसात असलेली वैरभावना यातून दिसून आली.

पक्ष म्हणून पक्षनेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यायला हवी होती. परंतु ते तसे घडले नाही. दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात कायम दुश्मनी वैर राहील. त्यामुळे गावचे वातावरण गढूळ होऊन गावात गटबाजीमुळे पुन्हा पुन्हा अशा हाणामारीच्या दगडफेकीच्या घटना होतील. म्हणून गाव खेड्यातील वातावरण राजकारणाने बिघडत आहे एवढे मात्र निश्चित…!

 

Leave A Reply

Your email address will not be published.