जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी 75 टक्के ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेसह (Balasahebanchi Shiv Sena) भाजपने (BJP) विजयाचा झेंडा फडकावला, असा दावा केला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांना उर्वरित 25 टक्के ग्रामपंचायत एन्ट्री मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा विजय मिरवणुकीत जामनेर (Jamner) तालुक्यातील टाकळी येथे भाजप कार्यकर्ते धनराज माळी यांचा दगडफेकीत मृत्यू झाल्याने गालबोट लागले. तथापि हा मृत्यू दगडफेकीत नव्हे तर सदर व्यक्ती अचानक बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्यात झालेल्या एकूण 122 निवडणुकांसाठी मतदान पार पडले होते. काल याची मतमोजणी झाली. त्यात सर्वाधिक जागांवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा व भाजपचा विजयाचा डंका वाजल्याचा दावा करण्यात येत आहे. जळगाव व धरणगाव तालुक्यात अनुक्रमे बारा आणि सात ग्रामपंचायतींपैकी जळगाव तालुक्यात दहा ग्रामपंचायतीवर तर धरणगाव तालुक्यात सात पैकी सहा ग्रामपंचायतवर बाळासाहेब शिवसेनेचा भगवा फडकल्याचे सदर पक्षातर्फे जाहीर करण्यात आले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविण्यात आला आहे.

दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निकाल लागल्यानंतर वेगळेच चित्र निदर्शनास आले. पारोळा तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेने सत्ता काबीज केली तर धरणगावात देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला भगवा फडकवला. मुक्ताईनगर तालुक्यातील मोठी बनवल्या जाणाऱ्या कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत वर मात्र भाजपला आपली बाजू राखता आली नाही. कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थक पॅनलने 17 जागांपैकी 13 जागांवर बाजी मारली. यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर भाजप शिंदे गटाच्या उमेदवाराला माती खावी लागली. यावल तालुक्यात ग्रामपंचायतीत कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली नसली तरी राजकीय पक्षाकडून दावे प्रति दावे केले जात आहेत. यात 17 सदस्य असलेल्या सर्वात मोठ्या न्हावी येथील ग्रामपंचायत ठाकरे गटाने बाजी मारल्याचा दावा केला जात आहे. एरंडोल ग्रामपंचायतीवर देखील शिंदे भाजप गटाचे वर्चस्व दिसून आले. अमळनेर तालुक्यात मात्र अनेक उलटफेर घडले. अमळनेरात दिग्गजांना हादरे बसले असून युवांनी एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले. येथील ग्रामपंचायतीत भाजपच्या झेंडा फडकला.

जळगाव जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच पदासाठी व सदस्य पदाकरिता मतदान पार पडले होते. याचा निकाल काल जाहीर झाला. जिल्ह्यात एकूण 80.24 टक्के मतदान झाले होते. एकूण जळगाव जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 140 इतकी होती. तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 122 होती. या जिल्हाभरात 421 एकूण मतदान केंद्र मतदानासाठी सुरू होते.

दरम्यान जिल्ह्यात सरपंच व सदस्य पदासाठी झालेल्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजू बळकट ठरते यासाठी सर्वांना निकालाची ओढ लागलेली असताना काल याचा निकाल जाहीर झाला. यात शिंदे गटासह भाजपने आपली पणाला लावलेली प्रतिष्ठा यशस्वी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.