महाराष्ट्राचे नवे राज्यपाल “रमेश बैस” यांचा शपथविधी संपन्न

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती झाली. त्यासोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) म्हणून आज रमेश बैस (Ramesh Bais) यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन,अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र लाट उसळली होती. अखेर कोश्यारी यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्याच आठवड्यात त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता. आज राजभवनात बैस यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडला.

रमेश बैस यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

रमेश बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. सध्या रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महापालिकेत नगरसेवक पदावर ते निवडून आले. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर १९८० ते १९८४ या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले. तिथे रमेश बैस यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पोलाद आणि खाण राज्यमंत्री, रासायनिक खते राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, खाण मंत्रालय, पर्यावरण आणि वन मंत्रालय, त्रिपुराचे राज्यपाल , झारखंडचे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.