जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हातात गावठी कट्टा घेऊन मुलगा दारूच्या नशेत घरी आला यावेळी तो कट्टा त्याच्या आईने हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत आई ला गोळी लागल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगर यथे घडली आहे. या प्रकरणी मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव महापालिकेतून आरोग्य सेविका म्हणून निवृत्त झालेल्या कलाबाई सोनवणे (६०) या पती, दोन मुले, दोन सुनांसह शिवाजीनगर भागात राहतात. ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा रोहित हा दारूच्या नशेत बेधुंद होऊन गावठी कट्ट्यासह दिसला. त्या वेळी कलाबाई यांनी मुलाच्या हातातून कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कट्ट्यातून गोळी सुटली व ती कलाबाईच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असताना सुनेने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया करून हातातील गोळी काढण्यात आली. या प्रकरणी कलाबाई यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहित सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.