विघ्नहर्ता गणरायाला दैनिक लोकशाहीचे साकडे

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे आज वाजत गाजत आगमन होऊन स्थापना होईल. तब्बल दहा दिवस गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहील. गेली तीन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यावर बंधने होती. विविध सार्वजनिक उपक्रम सुद्धा केले गेले नाहीत. त्यामुळे गणेश भक्तांचा विशेषतः महाराष्ट्रातील गणेश भक्तांचा हिरमोड झाला होता. त्यातल्यात्यात गतवर्षी छोटेखानी प्रमाणात कार्यक्रम गर्दी विना पार पडले. एवढे समाधान गणेश भक्तांना मिळाले. यंदा गणेशोत्सव भक्तांना उत्साहात साजरा करता येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना करून भक्तांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक आरास करण्याची सार्वजनिक मंडळात जणू स्पर्धा लागलेली असते. प्रत्येक घरोघरी प्रत्येक कुटुंब मनोभावे गणेशाची स्थापना करून सकाळ-संध्याकाळ एकत्रित गणेशाची आरती केली जाते. गणेश ही विद्येची देवता म्हणून आधी नमन गणरायाला केले जाते. घराघरात व्यक्तिगत तसेच सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. गणरायाला विघ्नहर्ता म्हणून पूजले जाते. आज मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने वाजत गाजत गणेश मूर्ती मिरवणुकीद्वारे गणेश भक्तांकडून उत्साहात स्थापन केली जाईल. स्थापनेनंतर विसर्जनापर्यंत दहा दिवस उत्साहाचे वातावरण असते. विघ्नहर्ता गणरायाकडून आपल्या गणेश भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी अशी आख्यायिका आहे. विघ्नहर्ता गणराया यंदा जळगाव शहर व जिल्हा वाशियांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी दैनिक लोकशाहीच्या वतीने गणरायाला साकडे घालण्यात येत आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत पाऊस बेताचाच पडला आहे. आतापर्यंत झालेल्या सरासरीपेक्षा कमी पावसाची भर जाता जाता भरून काढावी, हे एक गणरायाला साकडे. त्याशिवाय शेतकऱ्यांची शेती बहरणार नाही. शेतीमध्ये पीक उत्तम आले तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर उद्योग व्यापाराची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. म्हणून बा गणराया जिल्ह्यातील कमी पावसाची सरासरी भरून काढ, हे तुझ्या चरणी प्रमुख साकडे. जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून जणू जळगाव शहर आणि जिल्ह्याला ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती उत्तम असताना सुद्धा औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई सारखा विकास न होता जळगाव जिल्हा मागे का राहिला? याचे उत्तर आम्हाला सापडत नाही. त्यासाठी गणराया जिल्हावासीय जनतेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना सकारात्मक ऊर्जा देऊन जिल्ह्याचा कायापालट कर…

जळगाव जिल्ह्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत. शाळा महाविद्यालयात शिकूनच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले टॅलेंट आहे. परंतु जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणानंतर नाशिक, पुणे, मुंबई तसेच प्रदेशात नोकरीसाठी जातात आणि ते तिथेच स्थायिक होतात. नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात थांबून आपला स्वतःचा रोजगार निर्माण करावा, ही अपेक्षा. स्वतःचा उद्योग सुरू करून त्या उद्योगात इतरांना नोकऱ्या दिल्या, तर जिल्ह्यातील टॅलेंट जिल्हा बाहेर जाईलच कशाला! बा गणराया त्यासाठी तू त्यांना जिल्ह्यात राहूनच जिल्ह्यासाठी काहीतरी करण्याची सकारात्मक ऊर्जा द्यावी, ही आमची आपल्याकडे प्रमुख मागणी राहील. जळगाव जिल्ह्यात व्यापार उद्योग वाढीसाठी लागणाऱ्या प्रमुख घटकांपैकी रेल्वे वाहतुकीचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचा उपयोग होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात पाण्याची चांगली उपलब्धता आहे. जिल्ह्याच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या तापी आणि गिरणा प्रमुख नद्या जिल्ह्यात आहेत. व्यापार उद्योगासाठी लागणारी विजेची उपलब्धता जिल्ह्यात आहे. दीपनगर थर्मल पावर स्टेशन मधून विजेची उपलब्धता होते. रस्ते वाहतुकीमध्येही जिल्ह्यात जिल्हा अग्रेसर आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे जिल्ह्यातील जाळे पसरले आहे. या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असताना जळगाव जिल्हा मागे का? या प्रश्नाचे उत्तर बा गणराया तुला द्यायचे असून, त्यावर तोडगा हवा आहे. एकेकाळी जळगाव हे टुमदार सुंदर शहर म्हणून देशात नावाजलेले होते. नगरपालिकेच्या पालिकेची १७ मजली प्रशासकीय इमारत असलेली देशातील एकमेव नगरपालिका म्हणून ओळखली जात होती. नगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढवून जळगाव वासियांना नागरी सुविधा देण्यासाठी जळगाव शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्सचे जाळे उभारून उत्पन्नाबरोबरच व्यवसाय वाढवला. जळगावचे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहण्यासाठी देशभरातील नगरपालिकेचे लोक नियुक्त पदाधिकारी भेटी देऊन ही संकल्पना सोबत घेऊन जात होते. परंतु गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची दयनीय अवस्था झाली आहे. गणराया त्यावर उपाय हवा, परंतु त्याबाबत जिल्ह्यातील राजकारण्यांचा दोष दिला जातो हे काही अंशी खरे असले तरी राजकीय लोकप्रतिनिधींनी विकासाच्या संदर्भात पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून, एकत्र येण्याची बुद्धी बा गणराया तू त्यांना दे, हे तुझ्या चरणी प्रमुख साकडे आजच्या तुझ्या आगमनानिमित्त लोकशाही तर्फे घालत आहोत…!

Leave A Reply

Your email address will not be published.