आव्हानी येथे शेतकरी महिलेची अडीच लाखात फसवणूक

0

धरणगाव;- तालुक्यातील आव्हाने येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिला शेतकरीला जुन्या मशीनला कलर मारून ते मशीन नवे असल्याचे भासवून सुमारे दोन लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार 14 मार्च ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी घडला. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील पृथ्वीराज मोटर्सचे संचालक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आव्हाने येथे राहणाऱ्या श्रीमती अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय ७२ )या शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असून त्यांनी नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नेवासा रोड वरील पृथ्वीराज मोटर्सचे संचालक संशयित बाबुराव रावसाहेब खेळकर यांच्याकडून विश्वासाने पावर टिलर घेतले. मात्र या पावर टिलरला नामांकित कंपनीचे बनावटी लेबल लावून जुन्या मशीनला रंग देऊन नवे असल्याचे भासवून, खोटा चेसिस नंबर प्लेट टाकून अन्नपूर्णा पाटील यांची फसवणूक केल्याचा प्रकार 14 मार्च 2023 ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी घडला. याबाबतचा जाब अन्नपूर्णा पाटील यांनी विचारला असता संशयित बाबुराव खेळकर यांनी शिवीगाळ करून पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला बघून घेईल अशी धमकी दिल्याने अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोन लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.