आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यपाल हे मानाचे पद आहे. त्यांनी खुर्चीचा मान ठेवावा. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज आहे. अशी टीका त्यांनी केली.

कोल्हापुरी वहान हे जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो तुम्ही लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करतात. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला.

पुढे ते म्हणाले की, कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यापालांना घरी पाठवायचे की त्यांना तुरुंगात पाठवायचे हा विचार करण्याची गरज आहे. मराठी व्यक्तींसोबतच अमराठी माणसेही चिडलेली आहेत.

ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील, ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्याच नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊनमध्ये त्यांना मंदीरे उघडण्याची घाई झाली होती. तेव्हा त्यांच्या पत्राला मी उत्तर दिले होते. याशिवाय त्यांनी महात्मा फुले यांचाही अपमान केला होता. आज तर त्यांनी कहर केला आहे. हे विधान अनावधानाने आलेले नाही. मागच्या काही दिवसांपासूनचे सगळे वरती आले आहे. त्यांची भाषण कोण लिहुन देते माहित नाही.

राज्यपालपदी असलेले कोश्यारी काही ठिकाणी खूपच सक्रिय असतात. तर, काही वेळेस अजगरासारखे सुस्त असतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपालांनी रखडवलेल्या 12 आमदारांच्या यादीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही उद्धव यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.