शाश्वत शेतीसाठी “मिश्र पीक” पद्धत

0

लोकशाही विशेष लेख

 

वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते परंतु इतर पिकांचाही या पद्धतीत अंतर्भाव करतात. सर्वसाधारणपणे या पद्धतीत एकावेळी दोन पिके लावतात परंतु काही वेळा तीन, चार अगर त्यापेक्षाही जास्त पिके घेतली जातात.

या पद्धतीचा जिरायती, बागायती, व कायम स्वरूपाच्या पीक-मळ्यांमध्ये अवलंब केला जातो. ही पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे.

मिश्र शेतीची उद्दिष्टे –

१) उपलब्ध शेतीच्या क्षेत्रातील जागा, पाणी, खते आणि मजूर यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे
२) अवर्षण आणि रोग व किडीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत होणारे संपूर्ण पिकांचे संभाव्य नुकसान वाचविणे
३) जमिनीची सुपीकता वाढविणे
४) शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजेची पिके एकाच शेतातून घेणे
५) शेतकऱ्याच्या रोजच्या खर्चासाठी लागणारा पैसा दुय्यम पिके विकून उभा करणे
६) रोग व किडींचे काही प्रमाणात नियंत्रण.

पद्धतीचे स्वरूप व प्रकार

या पद्धतीत एक मुख्य पीक असते व एक पेक्षा जास्त दुय्यम पिके असतात. मुख्य पीक व दुय्यम पिकांचे परस्परांशी प्रमाण सर्वत्र सारखे नसते. काही ठिकाणी दुय्यम पिके मुख्य पिकांत अगदी तुरळक प्रमाणात पेरली जातात, तर काही ठिकाणी ते दुय्यम पिकाखालील क्षेत्र १५–२०% अगर त्याहून जास्त असते.
सर्वसाधारणपणे दुय्यम पीक

१) तूर, उडीद, मूग, मटकी, हरभरा वा कुळीथ या कडधान्याचे पिक
२) भुईमूग, एरंडी यांसारख्या तेलबिया
३) कापूस, अंबाडी यांसारख्या धाग्याचे पिक
४) भाजीपाल्याच्या पिकांपैकी असते

फळबागांतून मिश्र पीक पद्धत सर्वत्र आढळून येते. काही ठिकाणी नारळ, सुपारी, फणस, आंबा, पेरू व संत्रे यांची झाडे एकाच बागेत लावलेली आढळून येतात परंतु पुष्कळ ठिकाणी झाडे पद्धतशीरपणे लावलेली नसतात. काही बागांतून पद्धतशीरपणे केळी, सुपारी, पानवेली, वेलदोडे अशा तऱ्हेने लावतात की, बागेतील जागेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो.शेतीच्या लहान क्षेत्रात मिश्र पीक पद्धत विशेष फायद्याची ठरते. कारण स्वतःच्या लहान लहान गरजेपुरती पिके शेतकरी लहानशा क्षेत्रातून काढू शकतो. गुजरातेत बाजरीबरोबर तूर, मूग, अंबाडी, भेडी, एरंडी अशी पाच अगर सहा पिकांचे थोडे थोडे बी मिसळून पेरतात. यामुळे त्या पिकांचे शेतकऱ्याच्या गरजेपुरते उत्पन्न एकाच शेतातून मिळते.

परेश दिलीप पालीवाल
संचालक – श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र, लासूर
मो.८३७८०९६३०३

Leave A Reply

Your email address will not be published.