आता भाकरीही महागली;ज्वारीचे भाव यंदा ३ हजार ५०० रूपये क्विंटल

0

जळगाव : सध्या बाजारपेठेत धान्याची आवक वाढली आहे. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व धान्याच्या किमतीत वाढ झाली. शिवाय गतवर्षी ३१०० रुपये क्विंटल असलेल्या ज्वारीचे भाव यंदा ३ हजार ५०० रूपये क्विंटलपर्यंत गेल्याने सामान्यांच्या जेवणाच्या ताटातून भाकरी सुद्धा दुर्मिळ होते की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शहरातील बाजारपेठेत सध्या नवीन गहू, बाजरी, दादर, मका, हरभरा, सोयाबीन व इतर धान्य विक्रीसाठी येत आहे. गव्हाची आवक मागील वर्षाएवढीच असली तरी भाव मात्र वाढले आहेत. गतवर्षी गहू २ हजार ४०० रुपये क्विंटल होता. यंदाचे दर ३ हजारांपर्यंत आहेत. अद्यापही काही ठिकाणी गहू काढणी होत आहे.

काढणीनंतर मशीनमधून गहू स्वच्छ करून बाजारात आणल्यावर त्याचे दर आणखी शंभर रुपयांनी वाढण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात
आली आहे. सध्या ३० किलोचा कट्टा १ हजार ५० रूपये, तर किंटलभर गहू घेतल्यास अडीच हजार ते ३ हजार ३०० रूपयांचा दर मिळत आहे. ज्वारीची किरकोळ विक्रीत ३५ ते ४०, तर दादर ४० ते ४५ रूपये किलोने विक्री होत आहे. दरम्यान, सध्या उन्हाळा सुरू असून एप्रिल-मे महिन्यात नागरिक वर्षांचे धान्य भरतात. नेमके त्याचवेळी दर वधारले असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.