भारत अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा देश

0

लोकशाही विशेष लेख

 

आपल्या भारत देशाला खूप मोठा असा अध्यात्मिक (Spiritual) वारसा लाभलेला आहे. भारत देश अध्यात्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिल्याचे आपणास दिसून येते. संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी शतकानुशतके ऋषी मुनींनी अध्यात्मिक उपदेश करून मोलाचे असे योगदान दिले आहे. आपल्याला संत परंपरेचा देखील वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम (Sant Tukaram), संत एकनाथ (Sant Eknath), संत रामदास (Sant Ramdas), संत कबीर (Sant Kabir) यांसारख्या महान संतांनी आपल्या अमृतवाणीतून अध्यात्माचे महत्व आपल्याला सांगितले आहे.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज दयावे । पसायदान हे ।।

संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी (Saint Dnyaneshwar) ‘पसायदान’ रूपी प्रार्थनेतून परमेश्वराला भक्तीभावाने आर्जव केल्याचे दिसून येते. अध्यात्म म्हणजे ‘अधि आत्म’ म्हणजेच आत्म्याचे अध्ययन, स्वतःशी एकरूप होणे. अध्यात्म आपल्याला स्वत्वाची ओळख करून देण्यास मदत करते. अध्यात्म धार्मिक किंवा सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाते. अध्यात्माला कुठल्याच धर्माचे वलय नसते. परंतु कुठलाही धर्म हा अध्यात्माशिवाय अपूर्णच आहे. भारत हा अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा देश म्हणून ओळखला जातो. हिंदू, जैन आणि बौद्ध या प्राचीन धर्मांनी देशाला आकार दिला. वैदिक युगात भारतीय अध्यात्मवादाची उत्क्रांती झाल्याचे दिसून येते. पारंपारिक हिंदू धर्मामध्ये अध्यात्मिक साधनेचे प्रामुख्याने तीन मार्ग विशद केल्याचे दिसून येतात; ते म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म.

ज्ञान मार्ग: ज्ञानसाधनेच्या यशासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवनात सद्सद्विवेकबुद्धी नुसार चालणे आवश्यक आहे.

भक्ती मार्ग: अध्यात्मिक साधनेत परमेश्वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग.

कर्म मार्ग: साधनेत फक्त विचारांनाच नाही तर आचरणालाही तेवढचं महत्व असते. कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता अंत:करणाच्या सर्वोत्तम आवेगानुसार कार्य करणे हे कर्मयोगाचे स्वरूप आहे.

हिंदु धर्माप्रमाणेच बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक शिकवणीतही अष्टांगिक मार्गाला फार महत्व दिले आहे. सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक् समाधी या अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर मिळवण्यात यशस्वी होतो.
अध्यात्मामध्ये मन एकाग्र आणि शांत ठेवण्याचे सामर्थ्य आहे. संत कबीर आपल्या दोह्यांमध्ये चंचल मनाची स्थिती अतिशय बोलक्या शब्दांत मांडतांना आपल्याला दिसतात.

मन लोभी मन लालची, मन चंचल मन चोर ।
मन के मता न चलिए, मन पल पल में काही ओर ।।

या मध्ये संत कबीर म्हणतात, माणसाचे मन लालसा, मोह, माया यांमध्ये अडकते. मनाची गती सुध्दा क्षणाक्षणाला बदलते. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि अशा या चंचल मनाला एकाग्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म. तसेच संत रामदास देखील आपल्या मनाला भक्ती- मार्गावरुन जाण्यास सांगतात..

मना सज्जना भक्ती पंथेची जावे,
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।
जनी निंदय ते सर्व सोडून दयावे,
जनी वंदय ते सर्व भावे करावे ।।

हे सज्जन मना, नेहमी भक्तिमार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकाना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे. परमेश्वराच्या सेवेत सदैव रममाण होण्यासाठी, निंदनीय वर्तवणूक सोडून जे वंदनीय आहे ते स्वीकारण्यासाठी मनाला अध्यात्मिक साधनेची गरज भासते. अध्यात्म हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. सामान्य स्थितीत इतरांकडे निर्णय आणि टीकेने पाहणे सोपे आहे, परंतु मनुष्य जेव्हा अध्यात्माच्या सानिध्यात वाढू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की इतरांबद्दल सहानुभूती आणि समजूतदारपणे वागणे किती आनंददायी आहे.

अध्यात्माविषयी जाणून घेतांना बऱ्याच वेळेस धर्म, कर्मकांड आणि अध्यात्म यांमध्ये गल्लत होते, परंतु हा पेच सोडवायचा असल्यास या संकल्पनांचा अर्थ समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. आज धर्म आणि कर्मकांड हे एकाकार झाले आहेत. परंतु धर्म व कर्मकांड यांच्यातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे.

सोप्या भाषेत धर्माची व्याख्या सांगायची झाली तर ‘धारयति इति धर्म’ म्हणजे ‘जो धारण केला जातो तो धर्म’ इतकी सुटसुटीत आहे. दैनंदिन आयुष्यात मनुष्य आई, वडील, शिक्षक, पती, पत्नी अशा कितीतरी भूमिका क्षणाक्षणाला धारण करत असतो. त्या त्या भूमिकेत असतांना त्याची जी कर्तव्ये आहेत ती पार पाडणे म्हणजे त्या धारण केलेल्या धर्माचे पालन करणे होय.

तसेच अध्यात्मिकतेला कुठल्याच धर्म व कर्मकांडाचे बंधन नसते. प्रस्थापित ‘धर्म’ आणि ‘कर्मकांड’ मनुष्याला भौतिक जगाशी संबंध प्रस्थापित करण्यात मदत करतात, परंतु मानवाला जगण्याचे दुसरेही एक क्षेत्र असते अंतरंगाचे नैतिक क्षेत्र. अध्यात्मिक साधनेचा संबंध हा या आंतरिक नैतिक विकासाच्या क्षेत्राशी आहे. जशी मेणबत्ती अग्नी शिवाय जळू शकत नाही, त्याच प्रमाणे अध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण आहे. अध्यात्मामुळे ईश्वरीय शक्तीचा साक्षात्कार होतो. आत्मपरिक्षण करता येते. त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर जडलेला अर्थ काय? याचा विचार सुरु होतो आणि मग एक ‘पुर्णत्वा’ ची आस निर्माण होते.

गायत्री अशोक शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज,
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.