भरघोस उत्पन्नसाठी माती परीक्षण गरजेचे

0

लोकशाही न्युज नेटवर्क

पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे याकरिता शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु रासायनिक खतांचा वापर हा बऱ्याचदा प्रमाणापेक्षा जास्त केला जातो. यामुळे साहजिकच उत्पादन खर्च तर वाढतोच परंतु यामुळे जमिनीचे आरोग्य देखील धोक्यात येते.

त्यामुळे तुमच्या शेतामध्ये कुठल्या पोषक घटकांची कमी आहे व त्यानुसार जर खत व्यवस्थापन केले तर नक्कीच कमीत कमी खर्चात तुम्ही योग्य खतांचे नियोजन करून चांगले उत्पादन मिळवू शकतात. परंतु याकरिता मात्र तुम्हाला माती परीक्षण करणे गरजेचे असते.

माती परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत त्याचे प्रमाण किती आहे हे परफेक्ट समजते व त्यानुसार शेतकऱ्यांना खतांचे नियोजन करता येणे सोपे होते. याशिवाय जर जमिनी चोपण किंवा खारवट असेल तर अशा जमिनीची सुधारणा करण्यासाठी देखील माती परीक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण समजल्यानंतर त्यानुसार खत व्यवस्थापन केल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा समतोल राखला जातो व त्याचा थेट फायदा हा भरघोस उत्पादनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मातीचा प्रतिनिधिक नमुना काढून प्रयोग शाळेमध्ये त्याचे रासायनिक विश्लेषण करून घेणे म्हणजेच माती परीक्षण होय.माती परीक्षणामध्ये मातीत असलेले मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे हे प्रामुख्याने तपासले जाते व त्यानुसार पिकांचे व खतांचे नियोजन करणे शेतकऱ्यांना सोपे असते.

परंतु माती परीक्षण करिता जागेची निवड व पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. नमुना घेताना जमिनीची रचना म्हणजेच तिचा उंच सकलपणा तसेच मातीचा रंग इत्यादी स्थिती लक्षात घेऊन शेतीचे वेगवेगळे विभाग पाडावेत व प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक देणे गरजेचे असते.

तसेच जनावरे बसण्याची किंवा झाडाखालील, कचरा टाकण्याची जागा किंवा पाणी साचून राहत असेल अशी जागा, बांधाजवळची जागा नमुना घेण्यासाठी निवडू नये. जेव्हा तुम्ही मातीचा नमुना तपासणीसाठी पाठवाल तेव्हा त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव,गाव, शेतीचा गट नंबर, मातीचा नमुना घेतल्याची तारीख, जमिनीचा प्रकार, मागच्या हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात कोणते पीक घ्यायचे आहे इत्यादी बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

माती परीक्षणाचे फायदे काय?

माती परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये कुठले मूलद्रव्य किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत व त्यांचे प्रमाण किती आहे हे आपल्याला समजते. त्यानुसार शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करणे सोपे जाते. माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन करून पीक उत्पादनामध्ये वाढ होते व खर्चात देखील बचत होते.

तसेच जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन क्षमता वाढवण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करता येतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मातीत असणारे नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जस्त, मॅगिनीज आणि तांबे यासारख्या मूलद्रव्यांची तपासणी केली जाते व मातीचा सामू, क्षारता, जमिनीतील सेंद्रिय कर्ब व आद्रतेचे प्रमाण देखील तपासले जाते व याप्रमाणे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.