घरातच छापल्या बनावट नोटा; उमेश पहुर पोलीसांच्या जाळ्यात

0

विशाल जोशी, वाकोद ता. जामनेर
लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर तालुक्यातील पहुर येथील बसस्थानक परिसरातील दिनांक १९ रोजी रात्री पहुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असतांना तसेच त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेत चौकशी केली. यावेळी त्याच्या पॅन्टच्या खिशात २०० रुपयाच्या तीन नोटा मिळुन आल्या तसेच त्याचे नाव उमेश चुडामन राजपूत असून तो हिंगोणे येथील रहिवासी असल्याचे सांगितले.

याच वेळी उमेशच्या खिशात मिळून आलेल्या नोटा हातात घेताच उमेशच्या हालचाली वाढल्यामुळे पोलीसांना संशय आला. या नोटा संशयास्पद वाटल्याने त्यांनी उमेशला विचारपूस केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी शेवटी पोलीसी हिसका दाखवताच उमेश पोपटासारखा बोलायला लागला.

दरम्यान त्याने सत्य परिस्थिती कथन केली. यावेळी त्याने सांगितले की, मी हिंगोणे येथील रहिवासी असून मी यूट्यूबवर पाहून रंगीत प्रिंटर व मोबाईलच्या साह्याने २०० रुपये दराच्या नकली नोटा तयार करून मार्केटमध्ये दिल्याची कबुली दिली. त्या माहितीनुसार पहुर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुढील तपासासाठी आपला मोर्चा हिंगोणे बुद्रुक गावात वळवला व संशयित आरोपी उमेश चुडामन राजपूत याच्या घराची झाडाझडती घेतली. त्याच्या घरात कॅनॉन कंपनीचे कलर प्रिंटर व २०० रुपये किंमतीच्या ४६ बनावट नोटा व नोटा बनवण्यासाठी लागणारा कोरा कागद व कटर असे साहित्य मिळुन आले.

या मिळालेल्या पुराव्यानिशी आणि संशयित आरोपीने दिलेल्या माहितीवरून संशयित आरोपी उमेश चुडामन राजपूत याच्या विरोधात पहुर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक १७५/२०२२ भादवी कलम ४८९(आ), ४८९(ब), ४८९(सी), ४८९(डी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून आरोपीने आजपर्यंत किती बनावट नोटा तयार केल्या, त्या बनावट नोटा कोणकोणत्या मार्केटमध्ये चालवल्या तसेच या बनावट नोटा बनवण्यासाठीच्या व मार्केटमध्ये चालवण्यासाठी अजून कोणी काही मदत केली आहे का ? याबाबत असून चौकशी सुरु आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोराचे उपविभागीय अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय सानप, पोलीस नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी यांनी केली असुन पुढील तपासात काय माहिती समोर येते याकडे पहुर गावासह पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.