आदिवासी विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींना फाशी द्या

एकलव्य संघटनेची पोलिस प्रशासन आणि तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही महिन्यांपूर्वी मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानवीय घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले असतांनाच एरंडोल तालुक्यातील खडके बु, येथील 5 आदिवासी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण होत असल्याची घटना दोन दिवसाआधी उघडकीस आली. ह्या दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करत एकलव्य संघटनेतर्फे कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक आणि तहसिलदारांना निवेदन देण्यात येवून या प्रकरणातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की खडके बु, येथे झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपींवर कठोर कारवाई करून संबंधित वसतिगृह, संस्था कायमस्वरूपी बंद करून शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडू नयेत. यासाठी कठोर कायदे देखील करण्यात यावेत, तसेच खडके बु॥ येथील शाळेतील आदिवासी विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी घटनेची सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मणिपूर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, अपंग सेल जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे, सुभाष मालचे, जय मोरे, गणेश मोरे, दिपक अहिरे, राजू सोनवणे, प्रविण पवार यांचेसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.