श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

लोकशाही विशेष लेख 

अभंग- ११

संतुष्ट चित्त सदासर्वकाळ

भक्तीचे वर्म जयाचिये हाती I
तया घरी शांति दया IIधृII
अष्टमहासिद्धी वोळगति द्वारी I
न वाजती दुरी दवडिंता II १ II
तेथें दृष्ट गुण न मिळेल निशेष I चैतन्याचा वास जयामाजी.II२II
संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ I
तुटली हळहळ त्रिगुणाची II३II
तुका म्हणे येथें काय हो संदेह I
आमचें गौरव आम्ही करूं II४II

अभंग क्रमांक ४११४

अध्यात्म- परमार्थ हा विषय इतर विषयांसारखा नाही. रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र या विज्ञानाच्या शाखा आहेत. कलेच्या शाखेत राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र हे विषय अंतर्भूत होतात. प्रत्येक विषयाचे काही नियम असतात शास्त्र असते गणित असेल तर सूत्र असतात, सिद्धांत असतात, प्रमेय असतात. गणित सोडवायचे तर सूत्र पाठ लागते हे अनुभवाचे आहे. कोणत्या शाखेचे आपण पदवीधर त्यानुसार अभ्यास ठरतो. ‘अध्यात्मशास्त्र’ हे अंतरंगाचे विज्ञान आहे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असे शास्त्र आहे. वरवर भगवी वस्त्रे, पाठांतर, गळ्यात माळ कपाळाला टिळा एवढाच काही परमार्थ नाही. देह- मन – बुद्धीची योग्य ती मशागत करून त्यावर संस्कार करून हे रोपटे लावायचे आहे म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणते,’ बोलाचे नव्हे हे शास्त्र’ अभ्यास करून काही गुण मिळतील असे हे संपादन नाही. संसार जिंकण्याचं अवघड काम येथे करायचे आहे. साधना सर्व अंगाने करून उत्तीर्ण व्हायचे आहे. नामस्मरण,ध्यान, सत्संग, वाचन, मनन, चिंतन, श्रवण, निरूपण सारं वर्षानुवर्ष करायचे आहे. कुठलीही कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, राजकीय, परिस्थिती, तेथील उलाढाली याचा स्वतःवर परिणाम न होऊ देता उपासना करावयाची आहे. भक्ती सोपी नाही. भवनदी पार करणे अवघड आहे. कारण मायेचा पूर आला तर त्या लोंढ्यात आपण वाहून जातो म्हणून ते कठीण आहे. तुकाराम महाराजही ती ‘सुळावरील पोळी’ आहे असे प्रतिपादतात. याचबरोबर भक्ती करणारा कसा ओळखायचा याच्या काही खुणाही सांगतात. त्यातील पहिली वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शांती, दया, क्षमा या तिन्ही गुणांची नित्य वस्ती भक्तांच्या घरात असते. आपण ही नित्य प्रार्थना म्हणतो, ‘या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता. जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी, सर्व भूतमात्रात एक भगवंत भरून राहिलेला आहे ही आंतरिक भावना, स्थिती किंवा बोध दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे.

संत नामदेव महाराजांनी तूप लावलेली रोटी त्या श्वानरूपी भगवंताला दिली, नाथांनी आपल्या जवळचे गंगाजल गाढवाला पाजले, मीराबाईने कृष्ण कृष्ण म्हणत विषाचा प्याला अमृताचा समजून पिला, सावतामाळ्यांनी ‘कांदा- मुळा- भाजी अवघी विठाबाई माझी’ या भावानं पिक काढली.

संतांच, भक्तांच हे वेगळंपण आहे. त्याचं भांडवल दया हे असतं. शांती परते सुख नाही हे त्यांना पूर्ण ठाऊक असते. समाधानासारखे थोर नाही हे त्यांनी अनुभवलेले असते. म्हणून संतांचे चेहरे प्रसन्न व शांत असतात. त्यांचे घरही तितके शांत असते अगदी, “पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या” संत तुकडोजी महाराज म्हणतात तशी त्यांची झोपडी इंद्रालाही हेवा वाटावे अशी संपन्न ठरते. अष्टमहासिद्धी वोळगती या भक्तांच्या घरात, संतांच्या घरात जणू पाणी भरत असतात. “काय उणे आंम्हा पांडुरंगा पायी” हेच इथे खरे ठरते.

आपलं स्वरूप चैतन्यरूप आहे खरं. म्हणून तर पहा सर्वसामान्य भगिनीही पहाटे उठताच दार स्वच्छ झाडते, सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीला प्रदक्षिणा घालते, घरात पूजा करते, दिवा लावते, सूर्यदेवतेला अर्ध्य अर्पून नमस्कार करते. का तर चैतन्यरूप वाटतं, तिचीही प्रचिती असते म्हणून ती कंटाळा करत नाही. उलट हे झाले नाही तर ‘बरं वाटत नाही’ असे म्हणते कारण चैतन्य ठायी ठायी आपण अनुभवत असतो.

संतांच्या घरात याचा परमोच्यबिंदू असतो कारण ते स्वतः सतत ‘संतुष्ट’ असल्याने ‘चैतन्यस्वरूपाची’ प्रचिती जवळ येणार येणाऱ्या प्रत्येकाला येते. त्यांच्या घरात,” जो जाई एक वार विसरी घरदार” व्यक्ती स्वतःचा प्रपंच विसरते.अगदी माहेरी गेल्यावर भगिनीवर्गाला जसे निश्चित वाटते तसेच संतांच्या सहवासात घडते. त्यांच्याकडे आपण कितीही शोधायला गेलो तरी एकही दृष्ट गुण सापडत नाही.

‘चंदनाचे हात पायही चंदन’ या सज्जनांमध्ये हिसंक काहीच नसते. सर्वांगाने साखर जशी गोड असते तसेच संत भक्त उत्तम साधक अंतरबाह्य गोड असतात. सत्वगुण-रजगुण-तमोगुण या तिन्ही गुणांचा पगडा त्यांच्यावर नसतो. सत्वगुणाचा अंगारा त्यांनी कपाळावर लावल्याने रजगुणाने माघार घेतलेली असते व तमोगुण तर पूर्णपणे उतरून गेलेला असतो. सर्वसामान्य माणसांना विंचू चावल्याने जशी परिस्थिती अनुभवास येते तसे त्यांचे होत नाही.

ते इतके आत्मतृप्त असतात की त्यांच्या मनात कोणताही संदेह नसतो,संशय नसतो. जीवन कृतार्थ झाल्याची हमी ते देऊ शकतात. संत तुकोबाराय म्हणून तर म्हणतात “आमचे गौरव आम्ही करू” आयुष्यात भाग्यवशात आपल्याला ही गौरवपत्र, सन्मानपत्र मिळतात. असेच आणखी एक या पद्धतीचे गौरवपत्र या जन्मात आपण मिळवायचा प्रयत्न करूया.

श्रीकृष्ण शरणं मम्…..

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.