वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण

0

भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. वीज बिल नियमित भरले पाहिजे, याबाबत दुमत असल्याचे कारण नाही. तथापि थोडीशी सवलत सर्वसामान्यांना दिली जात नाही. धनदांडग्यांचे कोट्यावधींचे बिल भरलेले नसते पण, त्यांची वीज तोडण्याची महावितरणच्या अधिकाऱ्यांची हिम्मत होत नाही. सर्वसामान्यांची वीज तोडण्यात मात्र मर्दुमकी दाखवली जाते.

अर्थात या बाबीचे कोठेही समर्थन करणार नाही असो. आता महावितरण कंपनीने आपला मोर्चा वीजचोरांकडे वळविला आहे. जळगाव शहरातील शनीपेठ येतील 50 वीज चोरांचे वीज केबल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. वीज चोरी करणाऱ्यांची फक्त केबल जप्त केल्याने प्रश्न सुटणार नाही. कारण दुसरी केबल आणून ते पुन्हा वीज चोरीचा कार्यक्रम पूर्वीप्रमाणे सुरू ठेवतात. फुकट वीज वापरायला मिळत असेल तर दुसरी नवीन केबल विकत आणून आकोडे टाकून वीज चोरी करणे त्यांच्यासाठी अवघड नाही. महावितरण कंपनीकडे वीजेचा पुरवठा कमी झाल्याने भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचा वीज चोरांविरुद्ध ही मोहीम त्यांनी सुरू केली. या त्यांच्या मोहिमेचे आम्ही स्वागत करतो. परंतु यापूर्वी वर्षानुवर्षे ही वीजचोरी होत असताना त्यांना ही चोरी दिसत नव्हती काय? हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल.

शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सजगता असताना आकडे टाकून वीज चोरली जात आहे. हे या महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही काय? बरे, विज चोरणाऱ्यांविरुद्ध मोहिम सुरू केल्यानंतर आकडे टाकलेले केबल जप्त करून काम थांबणारे नाही. ज्यांच्याकडून वीज चोरी केली गेली, ज्यांचे आकोडे केबल सह जप्त केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर रीतसर दंडात्मक कारवाई झाली तरच पुन्हा ते वीज चोरणार नाही. तसेच नवीन वीज चोरू पाहणाऱ्यांवरही दहशत बसू शकते. अशा केबल जप्त केल्या तर उद्या अथवा एक-दोन दिवसांनी ये रे माझ्या मागल्या असे प्रकार सुरू होतील. म्हणून पुन्हा वीज चोरीची हिम्मत दाखवणार नाही. म्हणून ही मोहीम सातत्याने राबवावी आणि वीज चोरांवर कडक कारवाई केली तरच त्याला आळा बसेल.

जळगाव सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुक्या सारख्या शहरातही आकडे टाकून सर्रास वीज चोरली जाते, हे सर्वश्रुत आहे. एवढेच काय तर ग्रामीण खेड्यात सुद्धा सर्रास आकडे टाकून वीज चोरली जाते. जळगाव शहराजवळ असलेल्या ममुराबाद या भागात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवला, तर त्यांना फार मोठी वीजचोरी होत असल्याचे दिसेल. या गावात वीज वितरण कंपनीकडून त्यांच्या फिडर वरून होणारा वीज पुरवठा आणि त्याबद्दल तेथून विजेचे बिल मिळते काय? याचा लेखाजोखा काढला तर 100 पैकी 20 टक्के विजेचे बिल मिळते हे महावितरणच्या लक्षात यायला हवे. परंतु त्यांच्या आशीर्वादाने ही वीज चोरी होत आहे, असे देखील ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलतात. अशाप्रकारच्या वीज चोरीला जबाबदार कोण? प्रत्येक घरातील साधारण विजेची चोरी आकोडे टाकून होते.

पिठाची गिरणी सुद्धा वीज चोरीतून चालवली जाते, असे निदर्शनास येईल. ज्यांच्याकडे पिठाची गिरणी आहे त्यांच्या मीटरचे बिल किती येते? हे पाहिले तर ही बाब सहज लक्षात येईल. पिठाच्या गिरण्या आता घरोघरी झाल्या आहेत. त्याला रीतसर परवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे स्वतःच्या दळणा बरोबर आजूबाजूच्या लोकांचे दळण करून देऊन फुकट विजेत कमाई करतात, ही बाब नाकारता येणार नाही. म्हणून महावितरण कंपनीने शनीपेठेतील पन्नास आकडे केबल जप्त केले म्हणून शेखी मिरवण्यात अर्थ नाही. यासाठी महावितरण कंपनीने उघड्या ताराने ऐवजी केबलमधून विजेचा पुरवठा करण्याकडे आपला मोर्चा वळवला पाहिजे. जे पूर्वी जळगाव शहरात खाजगी कंपन्यांकडून करण्यात आले होते. असे होणे आवश्यक आहे. शनिपेठ येथील वीज चोरी तर एक उदाहरण आहे. संपूर्ण शहरात मोहीम साखळी राबवली तर फार मोठी वीजचोरी सापडू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.