नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

0

जळगाव शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे शहर नशिराबाद येथे पिण्याच्या पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळाला पाणी आले नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नशिराबादकर वणवण भटकत आहेत. उन्हाळ्यात अनेक वेळा विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नशिराबादला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आहे. परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून नशिराबादकरांसाठी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे. नशिराबादला कायमस्वरूपी 17 कोटी रुपयांची शेळगाव बॅरेज मधून पाणी पुरवठा योजना तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या काळात मंजूर करण्यात आली होती.

शेळगाव बॅरेज येथून सुमारे बारा किलोमीटर अंतरावरून हे पाणी नशिराबाद येथे आणले गेले. नशिराबाद येथे पाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. तथापि गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेला अनेक विघ्न आले. आता 31 लाख रुपये विज बिल थकले आहे. त्याचबरोबर या योजनेतून मिळणारे पाणी शेवाळयुक्त मिळत होते. तथापि चार वर्षाचा वर्षापासून ही योजना बंदच असून 17 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. आता वाघुर धरणाजवळील बेळी आणि फर्दापूर येथून नशिराबादला पिण्याचे पाणी मिळते. तथापि गेल्या महिन्याभरात अनेक वेळा पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप नादुरुस्त होत असल्याने नशिराबादकर ऐन उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. पिण्याचे पाणी धरणात उपलब्ध असताना केवळ चुकीच्या व्यवस्थापनामुळे नशिराबाद मध्ये पाण्याच्या टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नशिराबाद येथे यापूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत तर्फे नशिराबादकरांना पिण्याचे नियमित पाणी देण्यात अपयशी ठरली होती. परंतु नगरपरिषद झाल्यानंतर नशिराबादकरांना नियमित पिण्याचे पाणी मिळेल हे स्वप्न स्वप्नच राहिले.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाणीपुरवठा हे खाते आहे. गेल्या अडीच वर्षात गुलाबराव पाटील यांच्याकडून नशिराबादचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा होती. तथापि गेल्या अडीच वर्षात नशिराबादच्या पाणीप्रश्नासाठी कसलेच पाऊल उचलले नाही. गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा हे खाते असल्यामुळे शेळगाव बॅरेजची 17 कोटी रुपयांचे योजना नव्याने कार्यान्वित होईल, असे वाटले होते. परंतु गुलाबराव पाटलांनी शेळगाव बॅरेज योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याबाबत अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला तर यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या काळात ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याने तसेच गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेकडे गुलाबराव पाटील दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

शेळगाव बॅरेज पाणी पुरवठा योजनेचे श्रेय गुलाबराव देवकरांना मिळू नये, हा यामागचा उद्देश असल्याचे दबक्या आवाजात नशिराबादचे ग्रामस्थ बोलत आहेत. एकंदरीत विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा हे खाते असताना 50 हजार नशिराबादकर ग्रामस्थ पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पाणीपुरवठामंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दृष्टीने ही नामुष्कीची बाब म्हणावी लागेल. शेळगाव बॅरेज योजनेतून पाणी मिळत नाही, कारण 31 लाख रुपये विजेचे बिल थकीत असल्यामुळे विजेअभावी पाणीपुरवठा मिळत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करावी आणि थकीत वीज बिलाबाबत काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे.

तथापि असे होताना दिसत नाही. त्याच बरोबर नशिराबादसाठी पाणीपुरवठा होणाऱ्या बेळी आणि फर्दापूर धरणाच्या ठिकाणी विद्युत पंप वारंवार बिघडत होते. हे चांगले लक्षण नाही. यंत्रणेत सुधारणा करण्याची जबाबदारी सरकारी खात्याची असताना आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांवर अथवा खात्यांवर पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही का? कारण महिनाभर वारंवार विद्युत पंप पंपात होणाऱ्या बिघाडामुळे जर दहा दिवस पाणी मिळत नसेल तर पाणीपुरवठा मंत्र्यांचे नियंत्रण नाही असे म्हणावे का ? संपूर्ण उन्हाळ्यात नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाई आहे. नशिराबाद हे शहर विशेष म्हणजे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातील होय. तरीसुद्धा पालकमंत्री यांच्याकडे डोळेझाक करीत आहेत. हे मात्र कळत नाही. विरोधक याचा फायदा उठवण्यात शिवाय गप्प बसणार नाही, एवढे मात्र निश्चित….!

Leave A Reply

Your email address will not be published.