दैवी चमत्काराचा अंत

0

गेली 75 वर्षे आपल्या स्वराने संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा संगीत विश्‍वातील धु्रवतारा अखेर निखळला. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतातील संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. गेली 28 दिवस कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बाहेर पडण्यासाठी मुकाबला करीत होत्या. मध्यंतरी त्यांच्या प्रकुतीत सुधारणाही झाली होती. परंतु अचानक पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. ब्रिच कँडी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी लता दिदींवर शर्तीचे उपचार केले. तथापि कोरोनामुळे शरीरातील सर्व अवयव फेल झाल्यामुळे अखेर रविवार दिनांक 6 फेबु्रवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला.

लतादिदींच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशात आणि जगात पसरली अन्‌ त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. ब्रिच कँडी हॉस्पिटलकडे चाहत्यांची रिघ लागली. रूग्णालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली. तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करावा लागला. संगीतामधले विशेष ज्ञान असो अथवा नसो परंतु लतादिदींच्या गाण्याचे स्वर कानावर पडले की, सामान्यातला सामान्य माणूससुध्दा गुणगुणत राहायचा. आपल्या 70 ते 75 वर्षाच्या कारकीर्दीत लतादिदींनी सुमारे 30 हजार गाणे गायिले आहे. मराठी – हिंदी व्यतिरिक्त सुमारे 35-36 भाषांमध्ये लातादिदींनी गाणी गायिली आहे. सुप्रसिध्द मराठी साहित्यिक कै.पु.ल. देशपांडे लता दिदींच्या सन्मानार्थ बोलतांना एके ठिकाणी म्हणाले होते, आकाशात देव आहे की नाही आम्हाला माहिती नाही परंतु आकाशात चंद्र सूर्य आहेत आणि लता दिदींचा स्वर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आकाशात कुठे ना कुठे लतादिदींच्या संगीताचा स्वर तरलत असतो. लतादिदी महाराष्ट्रीयन आहेत याचा आम्हा मराठी बांधवांना सार्थ अभिमान आहे. अशी लता पुन्हा होणे नाही. लतादिदीच्या गाण्यांचा अनेकांवर मोठा आघात केलेला आहे. ये मेरे वतन के लोगो हे गीत राजधानी दिल्लीत गायल्यानंतर तत्कालिन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.

आपल्या स्वरांनी संगीत विश्‍वावर अधीराज्य गाजवणाऱ्या लतादिदीचं खाजगी जीवन अगदी सर्वसामान्यांप्रमाणे होतं. एक व्यक्ती म्हणून त्यांचा साधेपणा सर्वांना अप्रूप वाटणारा होता. त्यांनी संगीताबरोबर सर्वसमावेशक असं जीवन जगल्या त्यांना खाण्याची आवड होती. त्या स्वत: अनेक पदार्थ बनवायच्या. स्वत:बरोबर इतरांना खाऊ घालायच्या. क्रिकेटची त्यांना विशेष आवड होती. सचिन तेंडलकर हा त्यांचा आवडता खेळाडू होता. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जाऊन लता दिदी या त्यांच्या कुटुबियांसमवेत क्रिकेट पहायच्या. आता अलिकडे टीव्ही क्रिकेटची मॅच लाईव्ह दिसते. त्यामुळे स्टेडियममध्ये न जाता दिवसभर घरी बसून क्रिकेट पहाण्याचा आनंद लुटायच्या. यावेळी तहान – भूक विसरून जायच्या. त्या स्वत: सचिन तेंडूरकरांच्या एका सत्कारप्रसंगी म्हणाल्या. मला क्रिकेटमधील बारकावे कळत नाहीत. तथापि क्रिकेट पहाणे मला आवडते. सचिनने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यांना अतिव दु:ख झाले होते. सचिनने आपली निवृत्ती मागे घ्यावी असे ट्विट करून आवाहन केले होते.

क्रिकेटचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी सुध्दा जेव्हा निवृत्ती जाहीर केली तेव्हा सुध्दा लतादिदींना वाईट वाटले. त्यावेळी सुध्दा ट्टिट करून धोनींनी निवृत्ती मागे घ्यावी असे आवाहन केले होते. याचा अर्थच असा होता की, सचिन – धोनीसारखे देशासाठी सतत खेळत राहावे असे वाटत होते. सचिन तेंडूलकर यांनी तर लतादिदींना आईच मानले होते. सांगायचे तात्पर्य लतादिदी क्रिकेटचं काही कळत नसल तरी त्या क्रिकेटच्या फॅन होत्या. लता दिदी मनाच्या फार मोठ्या होत्या. कुणाच्या पाठीमागे अथवा त्यांच्या समोर कुणाची निंदा करू नका असे आव्हान करायच्या. त्यांनी अनेकांना आर्थिक सहकार्य करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे. अनेक नव गायकांना पुढे करून त्यांना गायक बनण्याची संधी दिली आहे.

संगीताच्या सेवेबरोबरच त्यांनी आपल्या चौफेर व्यक्तिमत्वाच्या दर्शन घडवले आहे. मंगेशकर कुटुंबातील पाच भावंडांपैकी लतादिदी या सर्वात मोठ्या होत्या. वडील पं. दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचेवर कुटुंबाची मोठी जबाबदारी पडली. लतादिदीने आपल्या भावंडांची जबाबदारी पार पाडली. सर्वांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे श्रेय त्यांनाच आहे अशी लतादिदी पुन्हा होणे नाही. लता मंगेशकर या शरीराने आपल्यातून गेल्या असल्या तरी त्यांच्या चैतन्यरूपी स्वरांनी त्या आपल्या सोबत अमर आहेत. त्यांना दैनिक लोकशाहीच्यावतीने हार्दिक श्रध्दांजली! लतादिदींच्या संगीत स्वर आहेत तोपर्यंत रसिक मंत्रमुग्ध होत राहतील. त्यामुळे जोपर्यंत आकाशात चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत लतादिदी अमर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.