जिल्हा कोरोनामुक्त पण…!

0

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या प्रसारानंतर अखेर आज जळगाव जिल्ह्याची कोरोनातून मुक्ती झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक व आनंदाची बातमी असली तरी जनतेने एकदम हुरळून जाता कामा नये. शासनाने गुढीपाडव्यापासून कोरोना नियंत्रणाचे सर्व निर्बंध उठवले असले तरी मास्क वापरणे हे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. कारण विदेशात अजून कोरोनाचा व्हायरस काही देशात काही प्रमाणात चालू आहे. त्यामुळे मास्क वापरणे हे ऐच्छिक असले तरी विमानतळावर मात्र मास्क वापरणे बंधनकारक करणयात आले आहे. कारण विदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा चंचू प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच प्रत्येकाने कोरोनाच्या व्हायरसविषयी सतर्क राहण्याची गरज आहे.

एक एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविण्याचे जाहीर करताच गुढी पाडव्याचा सण अत्यंत धूमधाममध्ये मराठी भाषिक तसेच हिंदू धर्मीयांकडून साजरा करण्यात आला. दोन वर्षाचे निर्बंध उठल्यानंतर गुढी पाडव्याचा सण अत्यंत तेजीत साजरा झाला. बाजारपेठेत धूमधडाका होता. एकट्या जळगाव जिल्ह्यात 20 किलो सोन्याची खरेदी झाली हे विशेष होय. 2500 दुचाकी वाहने तर 1500 च्या चारचाकी वाहने खरेदी झाल्याची नोंद आहे. 50 चारचाकी वाहने खरेदी करणारे वेटिंग लिस्टवर होते. कपडा मार्केट तेजीत होता. घरोघरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकंदरीत जीवनावश्यक वस्तूंच्या भावात कमालीची तेजी अर्थात भाव आकाशाला भिडल्याने सर्व सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तरी सुध्दा कोरोना निर्बंधातून मुक्त झाल्याने पारतंत्र्यातून स्वातंत्र्य गवसल्याचा आनंद सर्वांना झाला.

मुस्लिम बांधवांचा रमजान सणसुध्दा कालपासून सुरू झाला. रमजान सण सुध्दा मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करतीलच. इतर सर्व सण उत्सव आता धूमधडाक्यात साजरे होतील यात शंका नाही. दोन वर्षे शिक्षण संस्थांमध्ये सुध्दा शुकशुकाट होता. ज्या बालकांना दोन वर्षापूर्वी शाळेत प्रवेश घेऊन शाळेत जायचे होते. त्यांना प्रत्यक्ष शाळेत जाता आले नाही. दोन वर्ष घरी बसून ऑनलाईन शिक्षण दिले गेले. त्यामुळे दोन वर्षात त्या बालकांना प्रत्यक्ष शाळा कशी असते, वर्गात बालकांना शिक्षण कसे शिकवतात, शाळेच्या क्रीडांगणावर विविध खेळ खेळण्यासाठी बालकांची होणारी किलबिल त्यांना पहाता आली नाही. त्यामुळे आता ही बालके दोन वर्षानंतर पहिल्यांदा शाळेत शिकायला चालले आहे ही बालकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब म्हणता येईल.

दोन वर्षात प्राथमिक माध्यमिक तसे महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेतले. परीक्षा ऑनलाईन पार पडल्या. आता प्रत्यक्षात ऑफलाईन शिक्षणाचे धडे घेता येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. इतर सर्वच क्षेत्रात असलेले बंधन उठले असल्याने दोन वर्षापूर्वीची स्थिती पूर्ववत निर्माण झाली आहे बाजारपेठेतील बंधने उठल्याने व्यापारी वर्ग तसेच ग्राहक सुध्दा मुक्तपणे आपले व्यवहार करताहेत. हातावर पोट असलेले सर्व मंडळी आता आपल्या पोटापाण्यासाठी व्यवसायात रममाण झाले आहेत. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमाचा धूमधडाका सुरू होईल. त्यावर अवलंबून असणारे सर्व घटक आता उत्साहीत दिसत आहेत.

महाराष्ट्र देशाबरोबर आपण आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दोन वर्षात 1 लाख 51 हजार 42 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 1 लाख 48 हार 950 रूग्णांनी कोरोनाच्या उपचारानंतर कोरोनावर मात करून बरे झाले. 2 हजार 592 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दु:खदायक बाब म्हणता येईल. यामध्ये कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण, यांचा समावेश आहे. त्या दृष्टीने कोरेना महामारीची दु:खदायक आठवण त्यांना सतत बेजार करणार यात शंका नाही. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी कमी होत गेली. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे 25 हजार 314 रूग्ण भुसावळ तालुक्यात तर त्या पाठोपाठ 15 हजारापेक्षा जास्त रूग्णांची संख्या चोपडा तालुक्यात झाल्याची नोंद आहे. कोरोनाचे सर्वाधिक 571 बळी जळगाव शहरातून घेतले आहेत. तर त्या पाठोपाठ भुसावळ येथे 340 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या महामारीतून मुक्त झाल्यमुळे जिल्ह्यासाठी फार मोठा दिलासा मिळालाय असे म्हणता येईल.

जळगाव जिल्ह्यातील एकूण 931 महिलांच्या पतींचे निधन झाल्याने या महिलांचे कुंकू कोरोनाने हिरावून घेतले आहे. अशा महिलांवर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरातून त्यांना सावरण्यासाठी प्रशासन धावून गेले. ही सुध्दा एक सुखद बातमी म्हणता येईल. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात पसरल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबातील वेगवेगळे सदस्य कोरोनाने हिरावून घेतले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. शासनाच्या योजनेमुळे त्यांना आधार मिळणार आहे. जिल्हा कोरोनातून कागदोपत्री मुक्त झाला असला तर त्याचा व्हायरस केव्हा डोके वर काढेल हे सांगता येत नाही. म्हणून जिल्ह्यातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रण नियमांचे पालन करणे सोडू नये एवढेच या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.