योगींच्या गोरखनाथ मंदिरावर हल्ला; हल्लेखोराचे नवी मुंबई कनेक्शन

0

लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क

योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये अज्ञात व्यक्तीने दहशत पसरली आहे. अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या व्यक्तीने गोरखनाथ पीठात शस्त्र उगारल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले. तसेच मंदिराजवळ उपस्थित लोकांना धारदार शस्त्राने घाबरवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या हल्ल्यानंतर मुर्तजाने “अल्लाह – हू- अकबर” नाराही दिला.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन पोलीस जवान जखमी झाले आहेत.

कोण आहे मुर्तझा अब्बासी ?

मुर्तझा अब्बासी असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी सुरु केलीय. उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून मुर्तझाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. मुर्तझा हा आयआयटी बॉम्बेमधून शिकलेला आहे.

तर, नवी मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तो वास्तव्यास असल्याची माहिती आहे. आता उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसचे पथक महाराष्ट्रात चौकशीसाठी येणार असल्याची माहिती आहे. अहमद मुर्तझा अब्बासी हा त्याच्या कुटुंबीयांसह 8 वर्ष मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास होता. नवी मुंबईतील त्या सोसायटीमध्ये सध्या त्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही.मुर्तझा अब्बासीच्या आधारकार्डवर नवी मुंबईतील पत्ता आढळून आला आहे. मुर्तझा अब्बासी हा आयआयटी बॉम्बेमध्ये शिकलेला आहे. त्यानं केमिकल इंजिनअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

नवी मुंबईतील पोलिसांच्या माहितीनुसार मुर्तझाकडे सापडलेल्या कागदपत्रांवर उल्लेख असलेला फ्लॅट गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर 9 मधील मिलेनियम टॉवरमधील सह्याद्रीस सोसायटीतील इमारत क्रमांक 9 मध्ये अब्बासी मुर्तझाच्या वडिलांना घर मिळालं होतं. 2013 मध्ये ते घर विकण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान मुर्तझा अब्बास यानं हल्ला गोरखनाथ मंदिर परिरसरात करण्यापूर्वी तो काही काळ मुंबईत होता असं समोर आलं आहे. मुर्तझा गोरखपूरला मुंबईहून आला होता. मुर्तझाकडे इंडिगो एअरलाईन्सचं तिकीटदेखील मिळाले आहे.

गोरखपूर मधील अब्बासी मुर्तझा यानं आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर दोन मोठ्या कंपनीत काम केलं आहे. देशातील दोन मोठ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांमध्ये तो काम करत होता. अब्बासी मुर्तझा याला कोरोना काळात नोकरी गमवावी लागली होती. तर, अब्बासी मुर्तझायाला त्याची बायको सोडून गेली होती. तसेच मुर्तझा अब्बासी याची मानसिक स्थिती ठीक नसल्यान त्याच्यावर उपचार सुरु होते. अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये उपचार करण्यात येत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.