गडकरींच्या जिल्हा दौऱ्याने लोकप्रतिनिधींना चपराक..!

0

22 एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम पार पडला. जळगाव जिल्ह्यातील सहा महामार्गांचे लोकार्पण आणि नऊ विविध प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. 2014 पासून आतापर्यंत 15 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली. येत्या 2024 पर्यंत आणखी 15 हजार कोटींची कामे होतील असे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणात दिले. मंत्री नितिन गडकरी मुक्त हस्ते जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी तयार आहेत. कुठल्याही योजनेचा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन जा आणि ती योजना मंजूर करून घ्या, असे खुले आवाहन जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना त्यांनी केले. परंतु जिल्ह्यातील आमच्या लोकप्रतिनिधींचा करंटेपणा यानिमित्ताने उघड झाला.

जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा मृत्यू मार्ग बनला होता तेव्हा, खोटे नगर ते कालिंका माता चौकापर्यंत फक्त चौपदरी करण्याची मागणी आमच्या नेत्यांनी केली. ती मंजूर झाल्यानंतर प्रत्येक जण त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत होते. परंतु त्यानंतर आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौफुली आणि कालिंका माता मंदिर चौक येथे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची आवश्यकता असताना त्याचा पाठपुरावा याच मंत्री महोदयांकडे करू शकले नाही. त्यामुळे या चौकांमध्ये रोटरी सर्कल बनवण्यात आले. हे सर्व रोटरी सर्कल आताच्या वाहतुकीसाठी सदोष बनले आहेत.

रोटरी सरकल बनवल्या पासून या चौकात अपघातांची मालिका सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना जळगावातील नागरिकांकडून त्याला विरोध झाला. त्यासाठी आंदोलनेही झाली. तथापि जनतेच्या भावनांना वाटाण्याच्या अक्षदा लावून अधिकार्यांसोबत आणि ठेकेदारासोबत टक्केवारी साठी संगनमत करण्यात मश्गुल होते. या चौकासंदर्भातील उड्डाणपुलाचे प्रस्ताव देऊन जिल्ह्यातील आमदार, खासदार विशेषतः जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर-उपमहापौर यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला असता तर या चारही ठिकाणी आज उड्डाणपूल झाले असते.

परंतु तसे न करता आता या चौकात अपघात होण्याचे प्रमाण थांबले नाही. म्हणून नितीन गडकरीं समोर भाषणाद्वारे मागणी करणे आणि निवेदन देणे या प्रकारामुळे आमचे आमदार, खासदार आणि पालकमंत्री उघडे पडले आहेत. कारण हे चारही चौक वाहतुकीसाठी सदोष बनले आहेत हे शेंबडं पोरही सांगू शकेल. आकाशवाणी चौकातील रोटरी सर्कलमध्ये कठडे मोडून महामार्गावरील सुसाट ट्रक घुसला. सुदैवाने सर्कल मध्ये कोणी बसलेले नव्हते म्हणून प्राण आली टळली.

अशा दुर्घटना या चारही चौका चौकात एक दिवसाआड होत असतात. त्यामुळे रोटरी सर्कल हे अपघात सर्कल म्हणून आता ओळखले जात आहे. यात सर्वस्वी जबाबदार आमचे लोकप्रतिनिधी आहेत, एवढे मात्र निश्चित. नितीन गडकरींनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील नेत्यांना चांगलीच चपराक दिली. तरसोद फाटा ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत मोठा उड्डाणपूल करण्याची घोषणा केली. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे, अशी आमच्या नेत्यांची अवस्था झाली. तरसोद फाटा ते कालिंका माता मंदिर चौकापर्यंत उड्डाण पुलाची घोषणा करून गडकरींनी आमच्या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. त्याचबरोबर गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्याची त्यांनी घोषणा केली. ट्रक टर्मिनससाठी जागेचा प्रस्ताव दिल्याबरोबर तो मंजूर करण्यात येईल असेही गडकरींनी स्पष्टपणे सांगून टाकले. आमच्या जिल्ह्यातील नेते फक्त मागणी करतात त्यानंतर त्याचा फॉलोआप घेतला नाही ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. खोटेनगर ते कालिंका माता मंदिर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे श्रेय जळगावच्या जनतेला द्यावे लागेल. कारण या महामार्गावर अपघातांमध्ये किड्या-मुंग्यांसारखे लोक चिरडले जात होते. त्यावेळी कृती समितीची स्थापना करून रस्ता रोकोसारखे आंदोलन केले. या आंदोलनात शाळकरी मुलांनीही सहभाग घेतलेला होता.

तेव्हा कुठे या महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. मंजुरींनंतर काम रखडले त्याला दोषी मात्र आमचे नेतेच आहेत. शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण झाले पण संपूर्ण महामार्ग अंधारात आहे. कारण या महामार्गावरील पथदिव्यांसाठी अनुदान मंजूर असतांना कंत्राट देण्याच्या प्रकारामुळे ते रखडले आणि आता चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रस्त्याची तोड फोड सुरू होईल. अंधारामुळे अपघात वाढताहेत परंतु त्याकडे कोणाचे लक्ष नाही. महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी महापालिकेची असतांना त्याबाबत चालढकल सुरू आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड होऊ शकले नाहीत याची खंत खुद्द मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली. आमच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठी ही शरमेची बाब आहे. काम करण्याच्या पध्दतीत बदल हवा आहे तो नसल्यानेच शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल वर्षानुवर्षे रखडला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.