संजय राऊतांना ईडीचं समन्स, शिवसेनेला आणखी एक झटका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर संकट उभं राहिले आहे. यात संजय राऊत बंडखोर आमदारांवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. यामुळे शिवसेनेला आणखी एक झटका बसला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत.

नेमकं प्रकरण काय ? 

२००६ मध्ये जॉईंट व्हेन्चरनुसार गुरू आशिष या विकासकानी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प २००८ मध्ये सुरू झाला. परंतु दहा वर्षांनंतरही हा पुनर्विकास न झाल्याचं लक्षात आलं. पत्राचाळीत विकासकांनी चार चार लोकांना एफएसआय विकला आणि जॉनी जोसेफ कमिटीच्या शिफारसीनुसार कंत्राट देण्यात आलं. ६७२ मराठी माणसांना यात घरं रिकामी करायला लावली. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा जवळपास १०३४ कोटींचा आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.