एकीकडे खाऊ गल्ली अन् दुसरीकडे घाणीचे साम्राज्य

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या इमारतीजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या खाऊ गल्लीतील दत्त मंदिराच्या रोडावर प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, याकडे महानगरपालिकेकडून नेहमीच कानाडोळा होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून येत आहे. एकीकडे खाऊ गल्ली असून त्याच्या पुढील भाग मात्र प्रत्यक्ष उकिरडा वाटावा इतका गलिच्छ असून या ठिकाणी प्रचंड घाणीसह दुर्गंधी पसरलेली असते. स्थानिक दुकानदारांना याचा नेहमीच त्रास असतो. याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना महापालिकेकडून केली जात नसल्याची ओरड व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून होत आहे.

नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून, पावसामुळे या रोडावर खाऊ गल्लीचा पुढील भाग आणि अग्निशमन दलाला जवळील गायत्री फुल भंडारच्या समोरच्या रस्त्यावर प्रचंड कचरा जमा होत असतो. त्यामुळे घाणीसह दुर्गंधी येऊन या ठिकाणी रोगराईला पोषक असे वातावरण निर्माण होते. ही बोंब आता नेहमीचीच झाली असून स्थानिक गाळेधारकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून तक्रार देऊनही याबाबत कोणतीही ठोस अशी उपाययोजना राबवली जात नाही. एक दोन दिवसाआड महानगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी घेऊन या ठिकाणी साफसफाई करते, मात्र आधीच दयनीय अवस्था असलेल्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पुन्हा निर्माण होऊन, आहे तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते.

महानगरपालिकेकडून गेल्या कित्येक वर्षात बाजूलाच असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. स्वच्छता अभियानांतर्गत एक-दोन दिवस वगळता या ठिकाणी योग्य अशी साफसफाई होताना दिसत नाही. महानगरपालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या रस्त्यावर अद्याप कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नाही. बाजूला असलेली गटार देखील बंद झाली असून बर्‍याचदा गटारीचे पाणी या रोडवर साठलेले असते. त्यामुळे हा परिसर नेहमीच गटारीच्या पाण्याने ओला झालेला दिसतो. दरम्यान दर वेळी पावसात या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन अधिकच बिकट परिस्थिती निर्माण होते.

एकीकडे खाऊ गल्लीसाठी जागा दिलेली असून पुढील रोडवर मात्र घाणीचे साम्राज्य असल्यामुळे खाऊ गल्लीत येणाऱ्या तसेच स्थानिक गाळेधारकांच्या जीवाला डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासन मात्र दरवेळी याकडे कानाडोळा करत असल्याची ओरड नागरिकांकडून होते.

Leave A Reply

Your email address will not be published.