वाचनातून आयुष्याला दिशा मिळते – डॉ. यशवंत महाजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या समन्वयातून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन आणि समाजकल्याण प्रशासनाचा ९० वा वर्धापन दिन महाविद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाला मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यशवंत महाजन, प्रमुख रासोयो विभागीय समन्वयक अतिथी डॉ. नितीन बडगुजर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जुगल घुगे,  महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्पना भारंबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते, ग्रंथपाल किशोर भोळे, सहाय्यक ग्रंथपाल गायत्री अत्तरदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. कल्पना भारंबे यांनी ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आपल्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती | या ग्रंथाच्या तेजामधूनही जन्म घेते क्रांती, ग्रंथ शिकवते माणुसकी अन् ग्रंथ शिकवते शांती निराश जीवा धीर धरुनी पुढे घेऊन जाती.  ग्रंथा आमुचे साथी ग्रंथ आमच्या हाती ग्रंथ उजळतो अज्ञानाच्या अंधाराच्या राती  या ओवीतुन भारताचे 11 वे राष्ट्रपती मिसाईल मॅन आणि महान लेखक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करीत आहोत.

तसेच आपल्या भारतामध्ये पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात गोरगरिबांसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती करून वंचितांना दुःखी त्यांना मायेची आधाराची काठी त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला असे थोर साहित्यिक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या जीवन कार्याला आदर्श मानून ९० वर्षांपूर्वी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली होती आणि याच विभागातून वंचितांना निराश्रीतांना आर्थिक दुर्बलांना दिव्यांग यांना या प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत त्यात्या काळात करण्यात आली. त्याचाही वर्धापन दिन आज महाविद्यालयात साजरा करण्यात आला.  थोर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश चौधरी यांच्या मनोगतात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.  वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात.  त्यांची आकलन शक्ती वाढते. वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे साधन आहे. कलाम यांनी “अग्निपंख भारत २०२०” या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी व शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा देतात.

विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर यांनी मनोगतात पुस्तक तर आपण वाचलीच पाहिजे. पण पुस्तकांसोबत आपण माणसेही वाचतो आणि माणसं वाचण्याची कला अवगत होण्यासाठी विचार प्रगल्भ होणे आवश्यक आहे आणि विचार प्रगल्भ होण्यासाठी  पुस्तक वाचन करणे आवश्यक आहे. मोबाईलचा ही आपणास वाचन संस्कृती जपण्यासाठी योग्य उपयोग करता येऊ शकतो.

अध्यक्षीय मनोगत डॉ. यशवंत महाजन यांनी वाचनातून आयुष्याला दिशा मिळते, वाचाल तर वाचाल समाजसुधारकांनी जे वाचन केले त्याचा परिपाक म्हणून देशात समाज सुधारणा चळवळी वाढीस लागल्या व त्यातून आज विकसित भारताकडे वाटचाल सुरू आहे. विद्यार्थी मित्रहो आज आपण बघतो की तुमच्या वयोगटातील यवक कामापुरते व परीक्षेकरिता वाचन न करता आपल्या आयुष्य घडण्यासाठी पुस्तक वाचले पाहिजे. वाचन कसे करावे हे देखील एक तंत्र आहे ते सरावाने अवगत करता येते असे अध्यक्ष मनोगतात डॉ. यशवंत महाजन यांनी विद्यार्थ्यांना उदबोधित केले आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त केल्या.

ग्रंथालयात ग्रंथपाल किशोर भोळे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ३० विद्यार्थ्यांना पुस्तक वाचन कार्यक्रमात उत्साही सहभाग दर्शविला.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२  मधील ग्रंथालयातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.  महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. जुगल घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी प्रवीण जोशी, राजकुमार पवार, सियाराम बारेला, चेतन नारखेडे यांचे साह्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.