गणपती विसर्जनाला गालबोट; पोलिसांकडून लाठीचार्ज

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धानोरा (ता. चोपडा) येथे पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं. रविवारी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असतांना ‘दहा वाजले वाद्य बंद करा’ असा दम सपोनि किरण दांडगे यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरला. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जागेवरच ठिय्या मांडला. यावेळी अचानक सपोनि दांडगे यांनी लाठी चार्ज केल्याने गावात धावपळ उडाली. दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यासह ग्रामस्थांनी दगडफेक सुरू केली.

धानोरा येथे गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत सुरु असतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना किरकोळ कारणांवरुन पोलिस गाडीत कोंबून ठेवले होते. यानंतर रात्री दहा वाजता मिरवणुक मशिद जवळुन जात असतांना वाजंत्री अचानक बंद करा; असे पोलिसांनी सांगितल्यावर गणेश मंडळांनी जागेवरच ठिय्या मांडल्यावर संतापलेल्या सपोनि दांडगे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज सुरू केला. यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील दुखापत झाली.

दरम्यान कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत हा वाद सुरूच होता. यामुळे काही मंडळांचे गणेश विसर्जन थांबले होते. मध्यरात्री पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मध्यस्थीने वाद मिटला.

Leave A Reply

Your email address will not be published.