सायरस मिस्त्रींच्या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रविवारी  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत.

सीट बेल्ट लावलेला नव्हता

पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं की, या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, गाडी अतिशय वेगात होती, त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा. मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर लक्झरी कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किलोमीटरचे अंतर पार केले होते. यावरुन ही गाडी अतिशय वेगात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

दुपारी अडीच वाजता  दुर्घटना घडली 

सूर्या नदीवरील पुलावरील रस्ता दुभाजकाला कार धडकल्याने मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे हे जागीच ठार झाले. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला परतत असताना दुपारी अडीच वाजता ही दुर्घटना घडली. मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोळे (वय 55) या कार चालवत होत्या. या अपघातात अनाहिता आणि त्यांचा पती गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचे कारण 

“प्राथमिक तपासणीनुसार, ओव्हरस्पीडिंग आणि चालकाच्या चुकीच्या निर्णयामुळे कारचा अपघात झाला. दोन्ही मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता,” असं अधिकाऱ्याने रविवारी रात्री सांगितलं. तसेच चारोटी चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फुटेजमधून पालघर पोलिसांना आढळलं की कारने दुपारी 2.21 च्या सुमारास चेकपोस्ट ओलांडला होता आणि अपघात 20 किमी पुढे (मुंबईच्या दिशेने) झाला होता. यावरून मर्सिडीज कारने 20 किमीचे अंतर (चेक पोस्टपासून) अवघ्या 9 मिनिटांत कापल्याचं दिसून येतं.

गाडी दुभाजकावर आदळली

तसेच अधिकारी म्हणाले की, सूर्या नदीवरील पुलावर दुपारी 2.30 वाजता हा अपघात झाला.मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे मागच्या सीटवर होते. डॅरियस अनाहितासोबत पुढच्या सीटवर होता, असं पोलिसांनी सांगितलं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एक महिला कार चालवत होती आणि तिने डाव्या बाजूने दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्ता दुभाजकावर आदळली. पोलिसांनी सांगितलं की, अपघातानंतर 10 मिनिटांत मदत पोहोचली. दोन जखमींना कारमधून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.