देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पवन पूज्य श्री धुंडीराज महाराज उपासना धाम येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत आयोजित श्री दत्तात्रय जयंती उत्सव सोहळा व नाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता झाली. हजारो भक्तांनी श्री दत्तात्रय दर्शनाचा लाभ घेतला.
पवन पूज्य श्री धुंडीराज महाराज उपासना धाम येथील श्री दत्त मंदिर येथे अविरत 26 वर्षापासून ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या श्री दत्त अखंड नाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीदत्त जयंतीच्या दिवशी दत्तप्रभूंना महाअभिषेक होऊन सायंकाळी जन्मोत्सव साजरा करून महाआरती करण्यात आली.
श्री दत्तात्रय मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये सूर्यफूल, कमळ व पुष्पहाराने सुशोभीत करण्यात आले. रात्री नित्य पंचपदी होऊन भजन मंडळीने भजन सादर केले. दिनांक २७ डिसेंबर रोजी अखंड नाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सप्ताह सोहळ्यामध्ये भाविकांनी सहभाग घेऊन श्री दत्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा केला. तर दिनांक २९ डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात आली आहे.