धनंजय देसाईला अटक; ७ दिवसाची पोलीस कोठडी…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पुणे येथे एका शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने बळकावू पाहणाऱ्या हिंदूराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय देसाई याच्या सांगण्यावरून त्याच्या समर्थक मुलांनी त्याला जमीन लिहून देण्यासाठी एका शेतकरी तरुणावर दबाव टाकला, तसेच तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी तरुणाला पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्यावर धारधार हत्याराने वारही करण्यात आले असल्याचे आरोप करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्यात पीडित तरूण गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह आणखी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी धनंजय उर्फ भाई जयराम देसाई (45), रोहित संजय काकतकर (29), श्याम विलास सावंत (29), निखील आनंद आचरेकर (38), सुरज रमेश मेहरा (23), कुणाल आनंद निकम (22) सर्व रा. परमाल बंगला, विठ्ठलवाडी, पौड. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांच्या शेजारीच धनंजय देसाई याची जमीन असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना जमीन देण्यासाठी देसाईकडून दबाव टाकण्यात येत होता. दरम्यान मंगळवारी सायंकाळी 10 ते 15 जणांनी फिर्यादीला पिस्तूल दाखवून धमकी दिली. तर इतरांनी तलवार, लोखंडी रॉड, काठ्यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने तरुणाच्या डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पौड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून धनंजय देसाईसह सहा जणांना अटक केली आहे.

दरम्यान पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.