वॉचमननेच मायलेकीचे हात-पाय बांधून घातला 24 लाखांचा दरोडा

0

पिंपरी – मायलेकीचे हात-पाय बांधून 23 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कदायक घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास येथे उघडकीस आली असून या दरोड्यामध्ये वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिणी आणि इतर दोन साथीदारांचा समावेश आहे.

याबाबत 19 वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालु, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महेश सुनार हा फिर्यादी यांच्याकडे वॉचमन म्हणून कामाला आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी महेश सुनार याने फिर्यादी व तिच्या आईला बहाणा करून खाली बोलविले. त्यांनी बेडशिट आणि ओढणीच्या सहाय्याने हातपाय बांधून ठेवले. ‘अगर मुहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्‍कम असा एकूण 23 लाख 60 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच जाताना पुरावा राहू नये यासाठी घरातील डीव्हीआर देखील जबरदस्तीने चोरून नेला.

दरम्यान आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आम्ही आरोपींना अटक करू, असा विश्‍वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.