अट्रावल येथील दंगलप्रकरणी २०५ जणांवर गुन्हा दाखल : १५ जण अटकेत

0

यावल ,लोकशाही न्युज नेटवर्क
यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार तब्बल २o५ आरोपीं विरुद्ध विविध कलमासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करत लाठ्या- काठ्याचा वापर करून, तुंबळ हाणामारी झाली होती. यात १० जण जखमी झाले होते. या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका गटाकडून ५७ तर दुसऱ्या गटाकडून ५१ यासह पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार सुनीता कोळपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत ९३ व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ०४ अशा चार फिर्यादीनुसार २०५ आरोपींवर विविध कलमान्वये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रशासन व दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीतील काही संशयित आरोपींची नावे समान आहेत. रविवारी २ एप्रिल रोजी सकाळपर्यंत पंधरा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची धरपकड अद्यापही सुरूच आहे.

अट्रावल गावात तणावपूर्ण शांतता
शनिवारी सायंकाळपर्यंत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, गुन्हे शाखेचे पो.नि. किसन नजन पाटील हे तळ ठोकून होते. रविवारी पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह फैजपुर सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, अविनाश दहिफळे यांच्यासह दंगल विरोधी पथक व पोलीस ताफा मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन पत्रकारांशी बोलतांना फैजपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.