हद्दपार असलेल्या डबल भेज्याची पोलिसांवर दगडफेक

0

जळगाव :- हद्दपार असलेल्या जुबेर उर्फ डबल भेज्या याला खांबावरील इलेक्ट्रीक वायर खेचत असतांना पोलिस पकडण्यासाठी गेले. परंतु पोलिसांवर त्याने दगडफेक करीत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार दि. ९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरात घडली. याप्रकरणी जुबेर उर्फ डबल भेज्या भिकन शेख (वय २४, रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अनिल भवारी, पो.हे.कॉ. विजय निकुंभ, नितीन केदारे, रतन हरी गीते हे शनिवारी रात्री ९ वाजेच्या समारास गेंदालाल मिल परिसरात जात होते. यावेळी एका इलेक्ट्रीक खांबावरुन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला जुबेर उर्फ डबल भेज्या हा वायर खेचतांना दिसून आला. पोलिसांना बघताच तो तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता, त्याने रस्त्यावरील दगड पोलिसांना फेकुन मारला. यामध्ये रतन गिते यांच्या पायाला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांनी डबल भेज्या याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पोलिसासोबत झटापट देखील केली. अन्य काही कर्मचारी त्याठिकाणी आले, त्यांनी जुबेर उर्फ डबल भेज्या याला पकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सिमेंटचा पोल घट्ट पकडन ठेवला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी त्याच्यावर लाठीचार्ज करीत ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर जुबेर उर्फ डबल भेज्या याने पोलिसांना मै देड साल जेल काटके आया हू, आप लोग मेरा कुच बिघाड नही सकते, कल मै कोर्ट मै आपके खिलाप कंम्पलेंड करूंगा और आपकी नौकरी खा जाऊंगा अशी धमकी देखील दिली. दरम्यान, त्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुबेर उर्फ डबल भेज्या याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर तो विनापरवानगी शहरात आला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा व हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.