मजुरांना आणणाऱ्या क्रुझरचा अपघात, 1 ठार; तिन जखमी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरानजीक भरधाव वेगाने विदगाव – ममुराबाद रस्त्यावरून मजुर घेवून येणाऱ्या चार चाकी वाहनाने क्रुझरने (Cruiser) झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१७ रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया पोस्ट वासूडी येथील जगदीश जंगलू पावरा याने जळगाव एमआयडीसीत वेअर हाऊस कंपनीत ट्रक मधील माल उतरविण्याचा ठेका घेतला असून, त्याच्या सोबत क्रुझरने सोबत गावातील काही मंजूरांना घेवून जगदीश पावरा स्वतः क्रुझर गाडी चालवित दररोज मजूरांना ने-आण करण्याचे काम करत असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्व मजूर जळगावकडे रवाना झाले. दरम्यान विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून त्यांचे भरधाव वाहन हे थेट झाडावर आदळून बाजूच्या चारीत पडले. या अपघातात कांतीलाल हिरालाल पावरा (२६) रा. चांदसुरिया पोस्ट वासूडी ता. शिरपूर जि.धुळे याचा जागीच मृत्यू झाला. तर रणजित उर्फ राजा जयसिंग पावरा (२४), गोकूळ वनासिंग भिल (३०), वांगऱ्या कालूसिंग पावरा (३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.