नकली बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या दोन भामट्यांन्या जेरबंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

यवतमाळ :बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न . नकली बंदुकीचा धाक दाखवून दोन भामट्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास फुलसावंगी ते महागाव दरम्यान घडली. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून दोन भामट्यांना रात्री १.३० वाजता जेरबंद केले. राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला.

टेंभी येथील दोघांनी आरडाओरड केली असता भामटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर भामट्यांनी महागावकडे पळ काढला. डॉ. अमर मोतेवार यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणाऱ्या सचिन कोनादे यांच्या बुलेटचे (क्र.एम.एच.२४/बी.एम.३८८०) हॅन्डललॉक आणि वायरिंग तोडून त्यांनी बुलेट पळवून नेली.

बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांची दुसऱ्यांदा चौकशी, समर्थकांची पोलीस ठाण्यासमोर गर्दी

शेजाऱ्यांनी आरडाओरडा करताच भामटे सुसाट वेगाने पळून गेले. या भामट्यांनी या घटनेपूर्वी रात्री ९ च्या सुमारास महागाव बसस्थानक परिसरात नकली पिस्तूल रोखून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

या सर्व घटनांची माहिती मिळताच उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित ठाणेदार विलास चव्हाण यांनी लगेच महागाव गाठले. त्यांनी पोलीस पथकाला भामट्यांच्या शोधात रवाना केले. अवघ्या एका तासात हे भामटे सवना शिवारातील जंगलात आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून नकली बंदूक जप्त केली. या प्रकरणी डॉ. अमर मोतेवार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून राहुल भालेराव व आकाश मिरासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून लुटमारीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.