गोवंश चोरी; गुन्हेगाराला अटक

0

लोकशाही  न्युज नेटवर्क 

 

नाशिक 

वाडीवऱ्हे : गोवंश चोरी. कत्तलीसाठी गोवंशाची चोरी करून त्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीतील एका गुन्हेगाराला वाडीवऱ्हे पोलिसांनी मुंबई येथून शिताफीने अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे हद्दीत बेलगाव कुऱ्हे गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून चोरी केलेल्या चार गाईंची कत्तल झाल्याने तालुक्यात आणि जिल्ह्यात याबाबत संताप व्यक्त होत होता. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५चे कलम ५ अ आणि ९ कायद्यानुसार भादंवि कलम ३७९, ४२९ अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी निवेदनाद्वारे हा संतापजनक प्रकार करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली होती.

त्याचप्रमाणे वाडीवऱ्हेबरोबरच जिल्ह्यातील काही भागात गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची चोरी होत होती. त्या अनुषंगाने अशा गुन्ह्यांना आळा बसावा, यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक संदीप हांडगे, तुषार खालकर, नीलेश मराठे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अतिशय हुशारीने कौसा, मुंब्रा (जि. ठाणे) येथून समीर नाजिम शेख (२७) याला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारदेखील जप्त करण्यात आली आहे. यातील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि वाडीवऱ्हे येथील पोलीस पथक करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.