खामगांव पोलीसांच्या धाडसी कारवाया !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

खामगांव (गणेश भेरडे);  एएसपी यांच्या पथकाने मागील काही दिवसात काही धाडसी कारवाया करुन गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या. हे खरे असले तरी शहर व तालुक्यात खुलेआम प्रतिबंधित गुटखा विक्री, अवैध दारु विक्री, वरली मटका यासारखे अवैध धंदे जोमात सुरु आहेत.

नुसतेच सुरु नसून फोफावत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपुर्वी काही जागरुक नागरिकांनी सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती याचा थोडाफार परिणाम जाणवला होता. परंतु कालांतराने संबंधितांच्या आशिर्वादाने सर्वच अवैध धंदे अलबेल असल्याचे दिसुन येत आहे.

महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक गुटखा विक्रीस बंदी घातलेली असतांनाही अनेक पानटपरीवर व छोट्या मोठ्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वीच पोलीसांनी खामगांव, शेगांव व संग्रामपुर तालुक्यातील गुटख्याची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी करणाया गुटखा माफियांना पकडले आहे.

तरी सुध्दा अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री खुलेआम सुरु आहे. शहरातील गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी लगतच्या अकोला, जळगांव, जालना व बुरहानपुर (मध्यप्रदेश) येथून गुटख्याचा पुरवठा होत असल्याने शहरातील गुटखा विक्री मात्र बंद झालेली नाही.

उलट चढ्या भावाने गुटखा विकुन शौकिनांची आर्थिक लुट केली जात आहे. म्हणजेच गुटखा माफियांविरुद्ध कितीही कारवाया केल्या तरी त्यांना फरक  पडत नाही. ते आपले नुकसान गुटखा शौकिनांकडून वसुल करतात. मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास धजावत नाही. तर स्थानिक पोलीसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

पोलीस विभागात ‘बंटीचा’ वरचष्मा

कारवाईचा ‘बडगा’ कोण उभारणार?

वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयातील ‘बंटीचा’ सध्या पोलीस वर्तुळात वरचष्मा असल्यामुळे कारवाईचा ‘बडगा’ कोण उगारणार? अशी स्थिती असल्याची माहिती समोर आली आहे. बंटीची अर्थपूर्ण भेट घेतल्यानंतर खुलेआम अवैध धंद्याला सुरुवात करा आणि कोणी पकडलेच असेल तर फक्त बंटीचे नाव उच्चारताच समोरचा हतबल होऊन अवैध धंदेवाईकाला सोडून देतो. कारण वरिष्ठांशी पंगा घेऊन कनिष्ठाचे काय भले होणार अशीही चर्चा सध्या पोलीस वर्तुळात हत आहे. तर स्थानिक पोलीसांऐवजी वरिष्ठांच्या कार्यालयातील पोलीसच ज्यादातर कारवाया करीत असल्याचे दिसून येत आहे.

जय किसान बाजार समितीचे काय?

नाफेडचा म्हणजेच सरकारचा चोरलेला लाखोचा माल (हरभरा) विकत घेणाया जय किसान खाजगी बाजार समितीमधील चारही फर्मच्या संचालकांविरुध्द काय कारवाई झाली? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. तर वरिष्ठांचाच आशिर्वाद असल्याने यापुढे पुढे काहीही होणार नाही असेही बोलल्या जात आहे. ‘तुका म्हणे उगी रहा, जे-जे होईल, ते-ते पहा’ अशी गत सर्वसामान्य जनतेची झाली आहे, एवढे मात्र खरे!

Leave A Reply

Your email address will not be published.