एमपीएससी ग्रस्तांचे मृगजळ : आभास आणि वास्तव समजण्याची गरज

0

 लोकशाही विशेष लेख

 

मित्रांनो काल परवा एमपीएससीचा निकाल लागला. समाज माध्यमांवर यशस्वी विद्यार्थ्याचे फोटो पाहीले. निवड झालेल्या उमेदवारांसाठी आनंद झाला, पण अयशस्वी विद्यार्थ्यांना दुःख ही झालं. यावर्षीचा निकाल ०. ००११% लागला आहे. तेव्हा या एमपीएससीच्या आजाराची व्याप्ती ही कोरोनापेक्षाही भयानक असल्याचं जाणवलं.. आणि तेव्हाच लक्षात आलं की या भयानक आजाराची लागण माझ्यासकट महाराष्ट्रातील अनेकांना झालीय. पण नव्याने या स्पर्धापरिक्षांच्या मृगजळात येणार्‍या काहींना यातील वास्तव माहीत व्हावं, एवढंच या हा लेखना मागचा प्रपंच.

 

आज महाराष्ट्रातील गावखेड्यापासुन ते शहरापर्यत बहुतांश पदवीधर मुलांना ‘एमपीएससी’ या भयानक आजाराची लागण झालीय. महाराष्ट्रभरातील हजारो अभ्यासिकेत लाखो सुशिक्षित युवक मोठमोठ्या ठोकड्यांमध्ये रात्रंदिवस तोंड खुपसुन बसलेले दिसतात. २४ तासापैकी १२ ते १६ तास अभ्यास करणारे विद्यार्थीही मी पाहीलेत. एक परिक्षा पास झाली, म्हणजे चांगली आरामदायी, सुरक्षित नोकरी, पैसा, पद, प्रतिष्ठा, पाॅवर मिळेल या आशेने महाराष्ट्रातील प्रत्येक पदवीधर युवक एकदा का होईना, पण या एमपीएससी आजाराला बळी पडतोच. काही समजदार यातुन वेळ राहता बाहेर पडतात, तर काही आपल्या अख्या आयुष्याची वाट लालदिव्याच्या नादापायी स्वतःहुन लावुन घेतात.

 

मित्रांनो जसे आपल्याकडे सोशल मिडियावर वेगवेगळे ट्रेंड चालतात तसेच काही ट्रेंड काही वर्षांपासून शिक्षणात देखील चालू आहेत. ९० च्या दशकात डीएड, बीएडचा ट्रेंड आला होता. तो ट्रेंड २००४ आणि २००५ पर्यंत कायम होता. मग तेव्हापासून आजपर्यंत इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा ट्रेंड चालू आहेत. ट्रेन्डची एक विशेषता आहे. ते काही काळानंतर सरसावतात. काही ट्रेंड हे विशिष्ठ काळानंतर संपतात, तर काही कमी होतात. पण या सगळ्यांमध्ये एक ट्रेंड मोठाच होत गेला. त्या ट्रेंडचं स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की तो ट्रेंड थांबावणे आता अवघड होतंय. त्या ट्रेंडचं आता कमर्शिअलाझेशन मोठ्या प्रमाणात झालंय. त्यात काही मोजकेच लोक करोडपती हिरो झालेत, तर अनेक लोक रोडपती झिरो झालेत. या ट्रेंडचं नाव आहे, ‘स्पर्धा परिक्षा’ (Competitive Examination)..!

 

सध्या आपल्याकडे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. अशातच अनेक विद्यार्थी हे लाखोंच्या संख्येने डिग्री घेऊन प्रत्येक वर्षी बाहेर पडतायेत. यामध्ये अनेक मुलांचं कॉलेजमधून प्लेसमेंट वगैरे होतंही. तर काहींना ओळखीने कुठेतरी जॉब मिळतो.. पण बाकीच्यांचं काय? आता पुढे करायचं काय? हा प्रश्न आ वासून समोर उभा राहतो. त्यावेळी सगळ्यांना एकच चांगलं उत्तर अंतरात्म्यातून येते, ते म्हणजे ‘स्पर्धा परीक्षा’. डिग्री झाल्यानंतर अनेक जण ठरवतात की १ ते २ वर्ष आपल्याला स्पर्धा परीक्षेला द्यायचे, पण कधी त्याचे ७ ते ८ वर्ष निघून जातात हे त्यालाही कळत नाही. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वय वाढलेलं असतं. त्यात मुख्यपरिक्षा उत्तीर्ण होऊन इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो “डिग्री होऊन एवढे वर्ष झाले, काय करत होता?” पण त्या प्रश्नाला उत्तर नसतं. मग यातूनच निराशा वाढायला सुरुवात होते. तणाव वाढायाला लागतो. शेवटी घरच्यांना सुद्धा कंटाळून म्हणावं लागतं. “तू तुझं बघ बाबा आता..!” मात्र या वेळी हातुन वय आणि अनेक संधी पार दूर निघुन नामशेष झालेल्या असतात. कधीकाळी जिल्हा चालवायची स्वप्न पाहणारा आज स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यास धजावत असतो. आत्मविश्वास पार जमिनीत खोलवर घुसल्यागत तो तरुण समाजात वावरत असतो कुंटुबीय, मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्या दृष्टीने तो चक्क वाया गेलेला असतो. आणि या सगळ्याची सुरूवात होते ती मोबाईल पासून, विद्यार्थी अवस्थेत असताना मोबाईलवर जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, संघर्ष, दृढता, निश्चय असे मोठमोठे अलंकारीत शब्द असलेली दोन, तीन लोकांची भाषणे (स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आयडॉल असलेल्या व्यक्तींकडून) तो ऐकतो. आणि ते कसे १० ते १२ वेळेस अपयशी झाले, तरी अधिकारी बनलेत. आपण त्याच्यापेक्षा सरस आहोत, हे डोक्यात घेऊन तो त्याचा मोर्चा स्पर्धापरिक्षांसाठी पुण्याकडे (Pune) वळवतो.

 

पुण्याकडेच का? कारण हे दोन, तीन आयडाॅलपण पुण्यातच राहुन अधिकारी झालेले असतात. घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलाला पुण्यात शिकायला पालक पाठवतात. कारण प्रत्येक मायबापाचं स्वप्न असते, की आपला मुलगा यशस्वी होऊन सेटल झाला पाहिजे. आणि हीच त्यांची प्रामाणिक इच्छाही असते. आई-वडील म्हणतात वेळ पडली तर जमीन विकू, पण मुलाला अधिकारी करूच. मग पोरग गावाकडून पुण्यात येतं. मग त्याची हॉस्टेल किंवा रूमची शोधाशोध सुरु होते. त्यातच त्याला काही गावाकडचे मित्र भेटतात. तेही दोन ते तीन वर्षपासून पुण्यात राहत असतात. मग पुण्यातील पेठेत कुठल्यातरी वाड्यात त्याची राहायची व्यवस्था होते.

रुमजवळच पुण्यात जे काही चार, पाच नावाजलेले आणि करोडो रुपये कमावलेले क्लासेस आहेत. त्या देखील त्याचं पेठेत असतात. हा मुलगा मग एक ते दोन लाख रुपये फी भरून क्लास लावतो. पहिल्याच दिवशी सगळ्या क्लासमध्ये उत्तीर्ण लोकांनां त्यांच्याच क्लासचे म्हणून सत्कार समारंभ आयोजित केलेला असतो. मुळात हा सत्कार समारंभ एखाद्या ग्रँड इव्हेंट पेक्षा कमी नसतो. याने तो भारावतो. हा विद्यार्थी शहरात पहिल्यांदाच गावाकडून आलेला असतो. त्यामुळे भाषेचा न्युनगंड, नविन जागा, बदललेलं हवामान याने तो हैराण, परेशान होत असल्यामुळे साहजिकच अनेक मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहुन सर्व समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करु लागतो. मग ग्रुप तयार होतो. मग हळूहळू चहाचे प्लॅन बनायला सुरुवात होते. मग या भावी अधिकार्यांचे चहा पिण्यात दिवसातले चार ते पाच तास कसे जायाला लागतात, हे त्याचं त्यांना देखील कळत नाही.

 

अजुन एक महत्वाची बाब एमपीएससीने आतापर्यत किती विद्यार्थ्याना अधिकारी बनवलं ते माहीत नाही, पण एमपीएससी ने विविध क्लासेस चालकांना, अभ्यासिका मालकांना, झेराॅक्सवाल्यांना, विविध पुस्तक प्रकाशनांना, वसतीगृह चालक, मेसवाले एवढंच काय तर चहाच्या ठेला लावणार्‍यांना देखील अति श्रीमंत केलं एवढ मात्र नक्की. तिकडं तोपर्यंत बापानं एक एकर शेत विकलेल असतं. असं नाही की पोरगं अभ्यास करत नाही. बाहेर शिकणाऱ्या प्रत्येक पोराला वाटत असत की, आपण काही तरी केलं पाहिजे. त्यामुळे ते पोरगंही मन लावून अभ्यास करत असतं. पण मग वर्षानुवर्षे एमपीएससीच्या जागाच निघत नाहीत किंवा जागा निघाल्या तरी १००० च्या वर कधी निघत नाही. आणि त्या जागांसाठी लाखोंच्या संख्येने फॉर्म येतात. बंर हे सर्व लाखो जण सगळं सारखंच अनुसरण करत असतात. त्यामुळे हे १००० सोडले तर बाकीच्यांना पुढच्या वर्षी पर्यंत थांबण्यापेक्षा पर्याय नसतो. आणि पुन्हा तेच चक्र दरवर्षी परत परत सुरूच राहतं.

 

५००-१००० विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीला लागतात, पण बाकीच्यांचं काय? त्यांच्या पोटापाण्याचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांचा जो वेळ वाया गेला त्याच काय? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. त्यामुळे नव्याने स्पर्धा परिक्षांच्या मृगजळात येणाऱ्यांनी आपला पहिला ए प्लॅन हा स्वतः पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभा राहणे हाच होय. आत्मनिर्भरता आल्यानंतर प्लॅन बी म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहावं. कारण उत्पन्न होणाऱ्या एकूण नोकरीच्या फक्त २% नोकरी ही सरकारी खात्यात आहे. आणि राहिलेली ९८% नोकरी ही खाजगी क्षेत्रात आहे. तेव्हा सरकारी नोकरी मिळवण्याची जरी सर्वानीच स्वप्न पाहीलीत, तरी ती स्वप्न पुर्ण फार कमी लोकांचीच होतील, हे वास्तव आता स्पर्धेच्या आणि प्रचंड बेरोजगारीच्या काळात नवतरुणांनी स्विकारायलाच हवं. शिवाय स्पर्धापरीक्षेतून यशस्वी होणाऱ्या काही मोजक्या लोकांची जशी सोशल मिडीयावर प्रेरणादायी भाषणं फिरतात, तशीच स्पर्धा परिक्षांनी किती अगणीत लोकांची भविष्य अंधकारमय केलीत, हे सांगणारे लेख, व्हिडीओ देखील व्हायरल व्हावेत. जेणेकरून या तरुणांचे डिमोटिवेशन न होता यातील वास्तव या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवापिढी समोर यायला मदत होईल.. ज्यामुळे या ‘एमपीएससी ग्रस्त’ रूणांना या आजारातुन त्वरित बाहेर पडुन काही तरी व्यवसाय, धंदा करता येईल, आणि नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणारे हात होता येईल…!

शब्दांकन :- हर्षल सोनार, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.