ग्रीष्म ऋतुचर्या : उन्हाळ्यात आरोग्य कसे जपावे

0

लोकशाही विशेष लेख 

आयुर्वेद शास्त्रानुसार वर्षभरात सहा ऋतू वर्णन केले आहेत. या प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात होणारे बदल व त्यामुळे मानवी शरीरात होणारे बदल जाणून घेऊन त्या प्रत्येक ऋतूनुसार आहार विहाराची पथ्यापथ्य सांगितलेली आहेत. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात आणि ह्या प्रत्येक ऋतूमध्ये जर त्या ऋतुचर्येचे व्यवस्थित पालन केले तर आरोग्य टिकून राहते किंबहुना हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

आता ग्रीष्म ऋतू सुरू झालेला आहे. म्हणजेच कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. या काळात सूर्याची किरणे अत्यंत प्रखर असतात. प्रचंड ऊन असते वातावरण वृक्ष होते. अंगाची लाहीलाही होत असते. यामुळे शरीरात वातदोष वाढतो म्हणून रुक्षता वाढलेली असते. अशक्तपणा जाणवतो. उन्हाळी लागणे, ताप, अतिसार, उलटी, मळमळ, त्वचेचे आजार, युरिन इन्फेक्शन, डोकेदुखी, हिट स्ट्रोक असे अनेक आजार होताना दिसतात. यामुळे आरोग्याची विशेष काळजी उन्हाळ्यात घ्यावी लागते.

वाढत्या उष्णतेमुळे सर्वांना शितलता थंडावा हवा असतो. त्यामुळे साधारण एसी कुलरच्या हवेत राहणे, कोल्ड्रिंक्स, फ्रिजचे गार पाणी, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे हे सर्व हवे असते. परंतु त्यामुळे अनेक आजार बळावतांना दिसतात. म्हणून आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ते पाहूया..

ग्रीष्म ऋतूमध्ये ब्राह्म मुहूर्तावर उठावे. साधारण पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान. अगदीच शक्य नसेल तर निदान सहा वाजता तरी उठावे. सकाळी उठून हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम, मेडिटेशन इत्यादी करावे. जास्त प्रमाणात व्यायाम करू नये. शारीरिक श्रम, अति कष्टाची कामे टाळावीत. रात्री जागरणे करू नयेत. ग्रीष्म ऋतू मध्ये दिवास्वाप अर्थात दुपारची झोप थोड्या प्रमाणात घेऊ शकतो. परंतु दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे टाळावे.

उन्हाच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. उन्हातून घरी आल्या आल्या गार पाणी पिणे, अंघोळ करणे हे टाळावे. आहारामध्ये गोड परंतु पचायला हलके आणि स्निग्ध असे पदार्थ घ्यावे. द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश असावा. घरी बनवलेली विविध सरबते, जसे लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, वाळा, खस सरबत इत्यादी घ्यावे. घरी बनवलेले फळांचे ताजे रस, नारळपाणी, नारळाची मलई घ्यावे. ताजी फळे जसे द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, टरबूज, खरबूज इत्यादी फळे खावीत. आंबा खायचा असताना आंबा आधी पाण्यात भिजवून ठेवावा. फळ सुद्धा योग्य प्रमाणात खावी. अति करू नये. तसेच आहारात गायीचे दूध, तूप, साठी साळीचे तांदूळ, ज्वारी, नाचणी, हिरवे मूग, मुगाची डाळ, फळभाज्या हे पदार्थ घ्यावेत.

आहारामध्ये अति उष्ण तेलकट मसालेदार, बाहेरचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ टाळावेत. पचायला जड असलेले पदार्थ घेऊ नये. मद्यपान करू नये. दही थंड असते असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. त्यामुळे उन्हाळ्यात रोज दही खाल्ले जाते. परंतु दही हे उष्ण असून शरीरात विविध आजार निर्माण करते. त्यामुळे ते रोज खाऊ नये. तसेच ताकही पिताना काळजी घ्यावी. ताक दुपारच्या जेवणानंतर एक वाटी इतकेच घ्यावे आणि ते घरी केलेले ताजे ताक असावे. बाहेरचे रेडिमेड ताक टाळावे. तसेच फ्रिजचे पाणी, कोल्ड्रिंक्स टाळावे. त्यापेक्षा माठातले पाणी प्यावे त्याने तहान क्षमते. खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावे शरीराला चंदनाचा लेप करावा. मोगऱ्यासारख्या सुगंधित फुलांचे गजरे माळा घालाव्यात. मग सुती पांढरे व लाईट कलरचे कपडे घालावे. उन्हात जाताना छत्री, टोपी गॉगल वापरावा.

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. बाहेर पडताना आवर्जून सनस्क्रीम लावावे. कोरफडीचा गर किंवा एलोवेरा जेल याचाही चांगला उपयोग होतो. विशेषता सनबर्नसाठी एलोवेरा जेल वापरावे. टोमॅटोचा रस, फळांचे गर, फळांचे रस हेही तुम्ही त्वचेला लावू शकतात. चंदन युक्त उटण्याचा वापर करावा. त्यामुळे घामही कमी येतो आणि घामाला दुर्गंधीही येत नाही. लघवीला जळजळ होत असेल तर धने भिजवून त्याचे पाणी प्यावे. कोथिंबिरीचा रस घ्यावा. डीहायड्रेशन होऊ देऊ नये. शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवावे. ग्रीष्म ऋतू मधील हे सर्व पथ्यापथ्य पाळले तर उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल.

 

डॉ. लीना बोरुडे 

आयुर्वेदाचार्य, पुणे 

मो. 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.