मुख्यमंत्र्यांच्या लेकाचे ‘कल्याण’ होईना ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही चर्चेचा गुऱ्हाळ अद्याप कायम आहे. महायुतीमधील प्रमुख पक्षांमध्ये अद्याप काही जागांवर एकमत झालेले नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे.

शुक्रवारी रात्री बैठक झाल्यानंतर, शनिवारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यांवर बैठक पार पडली. ही बैठक जवळपास साडेतीन तास चालल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे हेही रात्री उशिराने उपस्थित झाले होते. त्यामुळे कल्याण मतदारसंघाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रात्री उशिराने दाखल झाले; तसेच शिवसेना नेते संजय शिरसाठ हेही हजर होते. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक जवळपास साडेतीन तास चालल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या जागा वाटपावरून मागील दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, सलग दुसऱ्या दिवशी ‘वर्षा’वर झालेली ही बैठक राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यातील काही जागांची अदलाबदल करण्याविषयी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील दोन मतदारसंघांसह ठाणे, कल्याण आणि इतर मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेली नाही.

 

नवीन चर्चांना ऊत

तत्पूर्वी जागावाटपाची चर्चा अंतिम स्वरूपात आली असून, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिली होती. त्यानंतरही या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मात्र नवी चर्चा सुरू झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.