कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कॉपी करायला नाही म्हणा- कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी (एप्रिल/मे/जून-२०२४) पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना ५ एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १५ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. दरम्यान कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या असून ‘कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कॉपी करायला नाही म्हणा’ असे आवाहन परीक्षार्थींना केले आहे.

पदवी (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू.) अभ्यासक्रमाच्या परीक्षा ५ एप्रिल पासून सुरु होत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी १ लाख २६ हजार ७१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये ६८ हजार ६१६ विद्यार्थी व ५८ हजार ९७ विद्यार्थिंनींचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना १५ एप्रिल पासून सुरूवात होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी एकूण २१ हजार ५३१ विद्यार्थी आहे त्यामध्ये ११ हजार ५३३ विद्यार्थी व ९ हजार ९९८ विद्यार्थिंनी आहेत. पदवी व पदव्युत्तर असे एकूण १ लाख ४८ हजार २४४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. मे अखेरपर्यंत परीक्षा संपणार असून त्या त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्यापासून ३० दिवसांच्या आत परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी संख्या विचारात घेवून अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक व वरिष्ठ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. कॉपी / परीक्षा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ अध्यादेश क्रमांक ९ नुसार होणारी कारवाई व परीक्षा गैरप्रकारासाठी किमान शिक्षा काय असतात याबाबत विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी यावेळी प्रथमच परीक्षा केंद्रावरील वर्गांवर मोठ्या आकारात पोस्टर्स लावले जाणार आहेत. त्यावर सर्व विषयांची गुणवत्ता रद्द, गुणवत्तेसोबतच पुढील दोन/चार/पाच परीक्षांना प्रविष्ठ होण्यास निर्बंध, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये प्रवेशास बंदी आणि कॉपी करायला नाही म्हणा (Say No To Copy) असा मजकूर छापण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेपासून याच मजकूराचा शिक्का परीक्षा प्रवेश पत्रावर मारला जात होता. यावर्षी देखील प्रवेश पत्रावर हा मजकूर राहणार असून त्या व्यतिरीक्त हे पोस्टर्स लावले जाणार आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत व्हाव्यात यासाठी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या आदेशान्वये दहा दक्षत पथके नेमण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी ५, धुळे जिल्हयासाठी ३, धुळे व नंदुरबार जिल्हा यासाठी १ आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी १ असे एकूण १० दक्षता पथके राहतील. याशिवाय ५ सुपर दक्षता पथके देखील नेमण्यात येणार असून सदर पथके परीक्षा केंद्रावर अचानक भेटी देणार आहेत. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. योगेश पाटील यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी परवापासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून या परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्वत: कॉपी करण्यासाठी नकार द्यावा असे आवाहन केले आहे. परीक्षा ही आपल्या जबाबदारीची भावन वृध्दींगत करणारी असते यातून आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या क्षमतांचे मूल्यांकन करता येते. कोणताही तणाव न घेता व न घाबरता परीक्षांना सामोरे जावे. परीक्षा म्हणजे स्पर्धा नव्हे. स्पर्धा स्वत:शी असायला हवी. पेपर सोडवितांना वेळेत सोडविण्याचे नियोजन करा, परीक्षेच्या काळात झोप पूर्ण घ्या आणि आरोग्य सदृढ ठेवा असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.