हक्काच्या जागा सोडू नका, शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

मुख्यमंत्र्यांनी काढली आमदारांची समजूत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मंत्री आणि आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. ‘राज्यातील शिवसेनेच्या अनेक हक्काच्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नका,’ अशी आग्रही मागणी अनेक आमदारांकडून करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांचे त्वरित पुनर्वसन करण्याची मागणीही या वेळी लावून धरण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्पात असताना, शनिवारी शिवसेना पक्षाची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेतील सर्व मंत्री, आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी महायुतीच्या जागावाटपावरून नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्तासंघर्षाचा दाखला अनेक आमदारांनी दिला. ‘आपण धाडस करून उठाव केला, म्हणून मित्रपक्षाला सत्तेचे फळ मिळाले,’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. ‘परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला; पण आपले मित्रपक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत का,’ असे प्रश्नचिन्ह अनेकांनी उपस्थित केल्याचे कळते. ‘रायगड, शिरूर हे मतदारसंघ आपल्या हक्काचे असतानाही मित्रपक्षाला देऊन आपण अपमान गिळून प्रचार सुरू केला आहे. परंतु, आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर अजिबात सोडू नये, पालघरही मित्रपक्षांना देऊ नका,’ अशी आग्रही मागणी या वेळी अनेकांकडून करण्यात आली.

‘महायुतीचे उमेदवार जिंकून आणा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना, आपापल्या मतदारसंघात जोमाने काम करण्याची सूचना केली. आपण केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, त्याचबरोबरच महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना त्यांनी केली. ‘युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही वाटा द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युतीधर्म पाळावा. आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. कोणी किती जागा लढवल्या, त्याने फरक पडत नाही. भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याने एक-दोन जागा जास्त लढवल्या, तरी फरक पडत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांची समजून काढल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.