मंत्री महाजनांच्या आदेशाला सहसंचालकांचा ठेंगा!

0

ठेका रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन : रुग्णवाहिका चालकांचा इशारा
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करुन कारवार्इ करावी अशी सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी दिली असतांनाही त्यांनी आदेशाला ठेंगा दाखविला आहे. तर दुसरीकडे संबंधित ठेका त्वरीत रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येर्इल असा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदार हा रुग्णवाहिका चालकांचे मानधन देत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेवून निवेदन देखील दिले मात्र अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे. खरेदी विभागाचे सहसंचालक डॉ. शिरोडकर यांनी संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देवूनही काहीही उपयोग झालेला नाही. यात सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांची भूमिका महत्त्वाची असतांनाही त्यांनी चालकांच्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याने चालक संतापले आहेत. जिल्हा शल्स चिकित्सकांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाचे सहसंचालकांपर्यंत पाठपुरावा करुनही संबंधित ठेकेदार कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबर्इ येथील आरोग्य भवन येथील सहसंचालकांच्या कार्यकक्षेतील हा विषय असतांनाही ते जिल्हा शल्स चिकित्सकांकडे बोट दाखवित असल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण झाली आहे.

मंत्री महाजनांच्या आदेशाला ‘खो’
जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी रविवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून हकीकत सांगितली. यावेळी मंत्री महाजन यांनी सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांच्याशी भ्रमनध्वनीवरुन चर्चा करुन संबंधित ठेका रद्द करावा अशी सूचना केली आहे. यापूर्वीही मंत्री महाजनांनी कारवार्इ करण्याचे आदेश दिले असतांनाही मंत्र्यांच्या आदेशालाच अधिकाऱ्यांनी ‘खो’ दिला आहे.

तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रुग्णवाहिका चालकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. रुग्णवाहिका चालक संपावर गेले तर आरोग्यसेवेचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. अधिकाऱ्यांनी त्वरीत ठेका रद्द करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.