शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना मोठा धक्का

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटातील (Shinde Group) आमदार लताबाई सोनवणे (Lata Sonawane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार लताबाई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने (High Court) दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कायम ठेवला आहे.

लताबाई सोनवणे या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत. लता सोनवणे यांनी 2019 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे नंदुरबार जात पडताळणी समितीने लता सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णया विरोधात सोनवणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, तेथे देखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा खंडपीठात दाद मागितली होती. परंतु, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आज सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, कोर्टाच्या या निकालानंतर आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, यावर आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बाजू स्पष्ट केली आहे. आमदारकी कुठेही गेलेले नाही, आमदारकी कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका फेटाळून लावली आहे. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात ती पुन्हा री ओपन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे, असे चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.