शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; आ. सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात वाद (Shivsena Vs Shinde Group) होतांना दिसत आहेत. शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जाणारा मुंबईतील प्रभादेवी येथे (Prabhadevi) गणेश विसर्जनादरम्यान (Ganesh Visarjan) शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर मध्यरात्री मोठा राडा झाला. तसेच दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन (Dadar Police Station) परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते.

प्रभादेवी परिसरात तणावाची स्थिती

दरम्यान यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यरात्री सुरु झालेला राडा अखेर पहाटे चार वाजेच्या सुमारास मिटला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनबाहेर पडले. या घटनेमुळे प्रभादेवी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची

गणेश विसर्जन सुरु असतांना शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद होत दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ

शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. संतोष तेलवणे हे शिंदे गटात गेल्यानंतरच शिवसैनिकांमध्ये संताप होताच. दरम्यान सोशल मीडियावरील पोस्टमुळे हा संताप अधिकच वाढला. तेलवणे प्रकरणानंतर शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला.

पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीमार

तसेच या सर्व घटनेनंतर दादर पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही जणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यरात्री पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

आ. सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप 

दादर पोलिसांनी याप्रकरणी  शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. त्यावेळी आमदार सरवणकर यांनी दादर पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बचावले असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र आमदार सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.