मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडली आहे. सततचे दौरे, सभा, कार्यक्रम (Program) यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्याने बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे. तसेच, बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार मात्र अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे (Uddhav thakrey) आणि शिंदे गटाकडून दाखल सहा याचिका एकत्र केल्या असून त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे तातडीने दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. यामागे ठोस कारण स्पष्ट नाही परंतु, त्यांचे राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीसंदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.