देशात मंकीपॉक्सचा धोका वाढतोय; केंद्राच्या सूचना जारी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोविडच्या संकटानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा (Monkeypox Virus) प्रादुर्भाव वाढतोय. व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) आज जारी केली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोणीही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात दीर्घकाळ किंवा वारंवार राहिल्यास या व्हायरसचा धोका होऊ शकतो.

आरोग्य मंत्रालयाने संक्रमित व्यक्तीला इतर लोकांपासून वेगळे ठेवण्याच्या सल्ल्यावर भर दिला आहे, जेणेकरून व्हायरस पसरू नये. तसेच, हँड सॅनिटायझरचा वापर, किंवा साबण आणि पाण्याने हात धुणे, मास्कने तोंड झाकणे आणि रुग्णाजवळ डिस्पोजेबल हातमोजे वापरणे, हात आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करणे, असे सांगण्यात आले आहे.

ज्या रुग्णांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यासोबत चादर, कपडे आणि टॉवेल शेअर करणे टाळा. त्याचबरोबर, संक्रमित व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांना जाणे टाळावे. तसेच, व्हायरसबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, देशात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे या व्हायरसवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि केंद्र सरकारने संसर्गाचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. सरकारी सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हे टास्क फोर्स देशातील रोगावरील उपचारांसाठी सुविधांचा विस्तार आणि या व्हायरसचे लसीकरण यासंबंधीच्या बाबींवरही सरकारला सूचना देईल.

याआधी मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, हा व्हायरस नवीन नसल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. संसदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शक्य ती देखरेख ठेवली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात मिळालेल्या अनुभवांचा अवलंब करून आम्ही काम करत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.