छत्रपती शिवाजी महाराज: स्टार्टअप निर्मितीचे प्रेरणास्थान

0

लोकशाही विशेष लेख

छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात स्टार्टअपचा पाया रचला असं म्हटलं तर ही नक्कीच अतिशयोक्ती म्हटली जाणार नाही. ‘स्टार्टअप’ या संकल्पनेची निर्मिती ही साडेतीनशे वर्षांपूर्वीच अवलंबली गेलेली आहे, हे ऐकून तुम्हाला नक्कीच अचंबा वाटला असणार. जोड उद्योग करून विकसित होण्याची संकल्पना शिवरायांनी त्यांच्या काळात निर्माण केली, ज्याला आपण आज ‘स्टार्टअप’ या संकल्पनेखाली विचारात घेऊ शकतो. यासाठी या विशेष लेखाचा अट्टाहास केला आहे. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊया…

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जनतेचे खरे राजे. महाराजांनी आर्थिक सुबत्तेमध्ये केलेलं कार्य स्वराज्यात फार मोठी भर घालतात. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती, व्यापार, उद्योग, त्या नवनवीन विकसनशील संकल्पना, ज्यांना आपण स्टार्टअप या संकल्पनेखाली विचारात घेऊ शकतो अशांच्या विकासासाठी अत्यंत मोलाची भर घातली आहे. त्या काळातही शिवरायांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला तोड नाही. शिवबा हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील नागरिकाला एका व्यवसायात गुंतून न राहता दोन व्यवसाय निर्माण करून त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची कला शिकवली व ती अमलातही आणायला लावली.

शिवरायांचा आधुनिक दृष्टीकोन
छत्रपती शिवरायांच्या काळातील एक महत्त्वाचा किस्सा इथे विचारात घेण्यासारखा आहे. राज्याभिषेकाच्या वेळी ब्रिटिश कंपनीचा वकील हेन्री ऑस्किडन याने शिवरायांना नजराणा देऊ केला होता. मात्र तो स्वीकारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हेन्री ऑस्किडन याला सक्त राजाज्ञा केली होती की, तुम्ही तुमची गलबते स्वराज्याच्या किनाऱ्यापासून चाळीस मैल बाहेरूनच मुसाफिरी करावी आणि इतर देशीय व्यापारी नौका व मच्छीमारांना नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आजच्या अनुषंगाने याचा विचार केल्यास महाराजांची ही राजाज्ञा आजच्या काळातील ‘आधुनिक सागरी आर्थिक क्षेत्र निर्बंध कायदा’ होता. त्या काळात त्यांनी घेतलेला हा निर्णय आजच्या व्यवस्थेत विचार करण्यासारखा आहे. यामुळे स्वराज्यातील नागरिकांना आर्थिक विकासासाठी प्रेरणा दिली. यातून शिवरायांचा आधुनिक दृष्टीकोन नक्कीच स्पष्ट होतो.

नव्या संकल्पना शिकण्याची प्रेरणा
शिवरायांनी आगरी, कोळी, भंडारी असा समूह जहाज बांधणी उद्योगात कामाला लावला होता. शिवरायांनी चक्क फक्त फतवा काढला होता की गोऱ्या टोपीकरांकडून म्हणजेच इंग्रजांकडून स्वराज्यातील नागरिकांनी जहाज बांधणीची कला आत्मसात करून घ्यावी आणि त्यामध्ये बदल करून देशी बांधणीचा मिलाफ करत नव्या जहाज बांधणी निर्माण करावे. ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातील स्टार्टअपची सुरुवात म्हणता येईल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीची कला आत्मसात करण्याचा जो फतवा काढला त्याचा स्वराज्याला व स्वराज्यातील नागरिकांना फायदा तर झालाच पण त्यामुळे अर्थार्जण होऊन आरमाराचे सामर्थ्य देखील द्विगुणित झाले. रायगडातील कुलाबा येथे शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीचा कारखाना निर्माण केला होता. या गोदीत गलबत, शिरब, पाल अशा अर्वाचीन काळातील विनाशिका जातीच्या जहाजांची निर्मिती केली जात होती. छत्रपती शिवबांच्या काळातील तंत्रज्ञानही प्रचंड विकसित होतं. यातूनच त्यांनी बरेच उद्योग निर्माण केलेले आहेत. युद्धनीतीशी संबंधित तोफ निर्मितीचा कारखाना देखील याच कालखंडात निर्माण झालेला आहे. ही उद्योगांची पायाभरणी ही एक प्रकारची औद्योगिक क्रांतीच म्हणता येईल.

शिवकालीन अनोखी स्टार्टअप उत्पादने
छत्रपती शिवरायांनी आपल्या काळात नवनवीन कल्पनांना नेहमीच वाव दिला आहे. रयतेमधील एखाद्या व्यक्तीने जर नव्या प्रकारची वस्तू निर्माण केली, तर तिला जाणून घेण्यासाठी ते त्या व्यक्तीला आपल्या दरबारात बोलवून त्याबाबत जाणून घेत असत. यातूनच शिवबांच्या मोठेपणाची कल्पना येते. या छोट्या छोट्या संकल्पनांची निर्मिती ही एक प्रकारे त्या काळातील स्टार्टअप होता हे विसरून चालणार नाही. कारण त्या प्रत्येक गोष्टी या नव्याने निर्माण झालेल्या असायच्या आणि स्टार्टअपची संकल्पना मुळात हीच आहे. तिला शिवबांनी त्या काळातही स्वीकारलेली होती. यामध्ये अधिकतर युद्धासाठीच्या शस्त्रसामग्रीचा अंतर्भाव होताना दिसतो. वाघ नखं, दांडपट्टा, छुपी छोटी हत्यारे, नवनवीन प्रकारच्या तलवारी, चाकू, बिचवा सोबतच तोफ, तोफगोळे, चिलखत, ढाल या व यांसारख्या अनेक शस्त्रांची निर्मिती हा त्या काळातील ‘स्टार्टअप’चा फार मोठा विकास होता. छत्रपती शिवरायांनी रायगडाला राजधानीची मांडणी करताना सर्वप्रथम बाजारपेठेची जागा मुकर्रर करून व्यापारासाठी बारा बलुतेदारांची सोय करून दिउली. यातून तळागाळातील लोहार, सुतार, पथर्वट यांच्या उत्पन्नाची सोय झाली होती. ही एक प्रकारे मानव संसाधन व व्यक्तीसापेक्षा उद्योगनीती म्हणता येईल. सोबत नवनवीन आभूषणे, जिरेटोप, वस्त्र यासह विविध प्रकारची दैनंदिन वापरातील वस्तूंची निर्मिती यातूनच शिवरायांनी रोजगाराच्या निर्मिती सोबतच नव्या संकल्पनांच्या निर्मितीला देखील चालना दिली, आणि यालाच अलीकडच्या काळामध्ये ‘स्टार्टअप’ ही संकल्पना म्हटली जाते.

महाराजांचं व्यापार व उद्योग विषयक धोरण
छत्रपती शिवराय हे स्वतःमध्ये एक इंक्युबेशन सेंटर तसेच इनोव्हेशन सेंटर होते. यात मुळीच अतिश्य्क्ती नाही. कारण शिवरायांनी प्रत्येक नवीन नवीन संकल्पनेला मोठ्या मनाने स्वीकारलं आणि त्यासाठी त्या त्या व्यक्तीला योग्य ती भेट देऊ केलेला आहे. त्याच्या कामाची ही पावती म्हणजेच त्याच्या निर्मितीला दिलेलं प्रोत्साहन होय. संकल्पनेचा उदय, तिची निर्मिती, त्यावर केलेलं संशोधन, त्यासाठी लागलेला खर्च याची परतफेड म्हणून शिवरायांनी त्या संकल्पनेचा उदय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ दिलं नाही. त्यांच्या प्रत्येक नवीन संकल्पनेचा दरवेळी पुरस्कार केला आणि त्याला आपल्या स्वराज्यातील ज्या घटकाशी संबंधित तो व्यक्ती उत्पादन करत असेल त्यात तो सामावूनही घेतला. अशाप्रकारे त्या काळातील स्टार्टअप मार्गदर्शन आणि पुरस्कार करणारं सर्वात महत्वाचं केंद्र म्हणून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ नामोल्लेख, ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. यातून शिवरायांनी रायगडावर निर्माण केलेली बाजारपेठ ही मराठ्यांच्या व्यापार विषयक धोरणाचं फार मोठ स्मारक म्हणता येईल. या बाजारपेठेमध्ये शिवरायांनी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर मोठमोठ्या साधनांना देखील बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली होती. आरमार निर्मिती हा त्यातील मोठ्या स्वरूपात विकसित स्वरूपातला

रयतेसाठी व्यावहारिक मार्गदर्शन
शिवबांनी राज्यामध्ये व्यापाराला फार मोठ्या प्रमाणावर चालना दिली. ‘आज्ञापत्र’ या ग्रंथामध्ये याबाबतची व्यापारी धोरणं अधिक विस्ताराने विचारात घेता येतील. यामध्ये अनेक नवनवीन व्यापाराशी संबंधित संकल्पना व त्यांच्याशी निगडित शब्दांचा उल्लेख आढळून येतो. आज्ञापत्रांमध्ये व्यापारी संबंधांबाबत व व्यापाराच्या विकासाबाबत महाराजांनी विकसित केलेली व स्वीकारलेली ध्येय धोरणे आजही अचंबित करतात. परकीय व्यापाऱ्यांची कशा प्रमाणे प्रेमाने वागून व्यवहार करावा, याबाबत देखील छत्रपतींनी मार्गदर्शन केल्याचं आढळतं.

‘उद्योगाशिवाय प्रगती नाही, व्यापारा शिवाय समृद्धी नाही’, अशी ठोस भूमिका छत्रपतींनी आपल्या काळात निर्माण केली. त्यांच्या या भूमिकेतून निर्माण झालेले असंख्य उद्योग हे स्वराज्याला अधिक विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. यामधले बहुतांश उद्योग हे नव्याने निर्माण झाले होते, ज्याला हल्लीच्या काळात आपण स्टार्टअप या संकल्पनेत मोडतो. स्टार्टअप हा शब्द नवा म्हणता येईल, मात्र स्टार्टअप ही संकल्पना नवीन नाही. कारण अलीकडे स्टार्टअप या संकल्पने खाली ज्या ज्या छोट्या मोठ्या उद्योगांची निर्मिती होत आहे, तशाच प्रकारच्या असंख्य छोट्या-मोठ्या व नवनवीन उद्योगांची निर्मिती करण्याची प्रेरणा छत्रपती शिवरायांनी आपल्या काळात स्वराज्यातील नागरिकांना दिली होती, हे नाकारून चालणार नाही. छत्रपती शिवराय हे एक महान राजे आहेत. त्यांनी रयतेच्या सुखासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी स्वतःला अर्पण केलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर देखील त्यांनी रयतेला साथ दिलेली दिसून येते. नागरिकांच्या समस्या सोडवण्या सोबतच त्यांनी नागरिकांच्या आर्थिक विकासाला दिलेली चालना लक्षणीय अशी आहे. त्यांच्या स्टार्टअप या संकल्पनेखाली निर्माण झालेल्या प्रत्येक कल्पनेला छत्रपतींनी दिलेलं प्रोत्साहन ही आजच्या काळातील उद्योगासाठी एक नवी प्रेरणा म्हणता येईल.

शिवछत्रपतींची स्टार्टअप प्लानिंग
शिवछत्रपतींची आर्थिक नियोजनाची बाब लक्षात घेताना त्यासाठी केलेले त्यांचं नियोजन ही स्टार्टअपचीच एक संकल्पना म्हणता येते. युद्ध मोहिमेच्या बाबतीत देखील याच प्रकारची निर्मिती करून शिवरायांनी मोहीम फत्ते केल्या आहेत. यातील एक उदाहरण म्हणून आपण तोरणा किल्ला जिंकण्याची मोहीम विचारात घेऊ शकतो. हातात काहीही नसताना शिवरायांनी आपल्या सोबतीला वेगवेगळ्या क्षेत्रातील कुशल अशा साथीदारांची सोबत करून स्टार्टअप या संकल्पनेखालीच नियोजन करून ‘प्लानिंग’ करत मोहिमेची सुरुवात केली. तेवढेच नव्हे तर त्यात आजच्या काळातील ‘प्रोजेक्ट वर्क’ प्रमाणे स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे झोकूनही दिलं. पुढे कामगिरी करताना ‘वर्किंग’ या कल्पनेचा विचार करता येतो. शिवरायांनी विविध कलागुणांनी युक्त अशा लोकांची एक टीम घडवली आणि प्रत्येकावर योग्य ती जबाबदारी देखील सोपविली यातून त्यांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन सहज होतं. आणि मोहीम फत्ते झाल्यानंतर त्यातून मिळालेलं ‘उत्पन्न’ म्हणजेच ‘इन्कम’ ही एक प्रकारे स्वराज्याच्या पुढील कामगिरीसाठी केलेली ‘इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणूक होती. यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्टार्टअपची निर्मिती आपल्या स्वतःच्या प्रयत्नांतून कशाप्रकारे केली कल्पना येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या विकासासोबतच स्वराज्याच्या विकासात देखील या स्टार्टअप संकल्पनेचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. गड किल्ल्यांची लूट, सुरत सारखी बाजारपेठ लुटणे, यातून निर्माण झालेला, पैसा हा त्यांनी स्वराज्यातील शिक्षण, संरक्षण, स्वच्छता, प्रशासन, भविष्यकालीन विचार, किल्ले बांधणी, कृषी व व्यापारासाठी नवनवीन योजना यांच्यासाठी वापरला. शिवरायांच्या नव्या किल्ल्याची निर्मितीचा विचार हा देखील एक प्रकारचा स्टार्टअप म्हणता येईल. कारण त्यांनी स्टार्टअपच्या संकल्पनेप्रमाणेच किल्ल्याची निर्मिती करतांना परिसराचा अभ्यास, त्याची भौगोलिक परिस्थिती, तो किल्ला बांधल्यानंतर होणारे सर्व प्रकारचे फायदे आणि त्याच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योजना या अगदी समर्पक अशाच आहेत.

शिवरायांचे नियोजन इतकं व्यवस्थित आणि बारीक असायचं की, आपल्या स्वराज्याच्या निर्मितीतील कोणतेही काम असो वा औरंगजेबासारख्या शक्तिमान मुघल राजाला हातावर तुरी देऊन पसार होण्यासारखी मोहीम असो, याबाबत ती कृती अथवा नियोजन घडून गेल्यानंतरही कित्येक काळापर्यंत समोरची व्यक्ती ही अनभिज्ञ असायची. शिवरायांनी निर्माण केलेली विश्वासर्हता ही आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ अशी म्हटली तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण गोपनीयतेच्या बाबतीत शिवरायांनी अत्यंत प्रामाणिक माणसांची निवड केलेली होती. आजच्या स्टार्टअप च्या संकल्पनेतही या गोष्टीचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमची संकल्पना जर गोपनीय राहिली नाही, तर दुसरा त्या गोष्टीला घेऊन स्वतःचा स्वतःचा स्टार्टअप निर्माण करू शकतो यात नक्कीच शंका नाही.

‘छत्रपती’ : जागतिक ब्रँड
शिवरायांनी आपल्या माध्यमातून स्वराज्यात निर्माण केलेलं स्वतःचं आणि स्वराज्यातील नागरिकांचे अस्तित्व हे त्याही काळात यशस्वीतेची एक नवी ओळख होती. शिवरायांनी एका विशिष्ट स्तरावर यश प्राप्त केलं आणि राज्याभिषेक करून घेतला. यातून निर्माण झालेली प्रतिष्ठा आणि त्यांना मिळालेलं ‘छत्रपती’ हे पद हे एक प्रकारचं पेटंट म्हणता येईल, ही बाब देखील विसरून चालणार नाही. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे स्वतः एक ‘जागतिक स्तरावरचा ब्रँड’ आहेत ही गोष्ट कुणीही नाकारण्याची हिंमत करू शकत नाही. अशा छत्रपतींनी निर्माण केलेले असंख्य स्टार्टअप, उद्योग आणि बाजारपेठा यादेखील त्यातल्या त्यात एक ब्रँड म्हणूनच उदयाला आलेल्या आहेत, हे ही तितकंच सत्य. शिवरायांनी भविष्यकालीन विचार करून सर्व क्षेत्रातील गोष्टींना प्रेरणा व उत्साह दिला. आपलं प्रभावी असं नियोजन, शिवरायांची तत्त्व, त्यांचा संयम आणि प्रेरणा या गोष्टी विचारात घेतल्या तर आजच्या काळातही एक छोटासा व्यावसायिक देखील या विचारातून एखादा उद्योग महर्षी झालाच तर त्यात अचंबा वाटण्याचे कोणतेही कारण नाही. या ‘स्टार्टअप’ विशेषांकाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या काळातील त्यांनी निर्माण केलेल्या स्टार्टअपची ही तोंड ओळख म्हणता येईल. कारण शिवरायांनी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी शब्द अपुरे पडावेत इतकं त्यांचं कार्य महान आहे यात शंका नाही.

राहुल वंदना सुनिल
उपसंपादक, लोकशाही समूह
जळगाव.
८८०६८८६१६६

Leave A Reply

Your email address will not be published.