स्टार्टअप : कायदा, नोंदणी आणि लाभ.. (भाग दोन)

0

लोकशाही विशेष लेख

आपण सध्या स्टार्टअपचा कायदा, डीपीआयआयटी नोंदणी आणि त्याचे मिळणारे लाभ याविषयी चर्चा करत आहोत. तर स्टार्टअप म्हणजे फक्त उत्पादन तयार करून त्यातून नफा कमवणे एवढाच उद्देश नसतो. काही स्टार्टअप हे सामाजिक देखील असतात. उदाहरण घ्यायचं झाल्यात झाल्यास ग्रामीण तथा शहरी भागातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करता येईल. जसे की, सांडपाणी, कचरा यांच्यापासून काही ना काही उत्पादन तयार करता येईल का? याचा विचार होय. कचऱ्यापासून रस्ता किंवा बांधकामासाठी ब्लॉक तयार करणे, सांडपाण्याला रिसायकल करून त्याला पुन्हा वापरात आणणे अशा काही प्रकारचे स्टार्टअप देखील सुरू करता येतात. सर्वसामान्यपणे आपण शेती ही शेतात करत असतो. म्हणजेच जमिनीवर करत असतो, पण मी आता बऱ्याच ठिकाणी स्टार्टअप निमित्त भेटी देत असतो तेव्हा मला लक्षात आलं की, आता शेती करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी जमिनीची गरज उरलेली नाही. काहींनी आपल्या आधुनिक कौशल्याने छोटेखानी प्रमाणात का होईना, पण हवेवर शेती करून दाखवली आहे.

आपण सर्वसामान्यपणे टोमॅटो लाल बघितला आहे, भेंडी हिरवी बघितली आहे, पण मी एका इंक्युबेशन सेंटरला भेट दिली तेव्हा मी तिथे काळ्या रंगाचे टोमॅटो बघितले. भेंडीचही तसंच.. हव्या त्या रंगात भेंडीची निर्मिती स्टार्टअप च्या माध्यमातून करता येते. मात्र हे सर्व करण्यासाठी योग्य ते संशोधन, आवश्यक ती उपकरणे आणि प्रभावी अशी वातावरण निर्मिती गरजेची असते. यासाठी लागत असतो तो म्हणजे पैसा. अशा प्रकारचा पैसा उपलब्ध करण्यासाठी किंवा आपण केलेल्या खर्च आपल्याला परत मिळण्यासाठी डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, रजिस्टर केलेल्या स्टार्टअपला आपला खर्च परत मिळवता येतो. राज्य सरकारम, केंद्र सरकार यासाठी इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला मदत करू शकते. त्यासाठी हे रजिस्ट्रेशन आवश्यक असतं. ही गोष्ट समजून घेत असताना अजून एक भाग समजून घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे ट्रेडमार्क.. उदाहरणार्थ मी एखादं भेंडीचे उत्पादन घेतलं, जी पिवळ्या रंगाची आहे. पण मी याचा ट्रेडमार्कच घेतला नाही. अशात इतर कोणी तरी माझं प्रॉडक्ट कॉपी केलं आणि स्वतःच्या नावावर रजिस्टर करून घेतलं. तर ज्याने रजिस्टर केलं त्याला त्याचे फायदे मिळतील. मात्र मी केलेली सगळी मेहनत वाया जाईल. जेव्हा ते प्रॉडक्ट मी बाजारात विकायला काढेल आणि ते विकायला काढल्यावर जर रजिस्ट्रेशन केलेल्या माणसाने माझ्यावर केस केली, तर मला त्याची नुकसान भरपाई करावी लागेल. म्हणजे काय तर मी या उत्पादनाची निर्मिती केली, त्यावर संशोधन केलं, त्याला खर्च लावला, त्याची संपूर्ण आयडिया माझी, पण मी काय केलं? तर मी ‘ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केलं नाही’. इथेच सगळ्यात मोठं नुकसान झालं. यासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजेच पेटंट रजिस्ट्रेशन अत्यंत गरजेचं आहे. या गोष्टी स्टार्टअप सुरू करताना फार बारकाईने लक्षात घ्याव्या लागतात.

बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशन मध्ये गोंधळ निर्माण होतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर काहींच्या लक्षात येतं की, मला प्रायव्हेट लिमिटेड करायची होती, पार्टनरशिप करायची होती. त्यामुळे या गोष्टी आधी समजून घेणे गरजेचे आहे. या सिरीजच्या माध्यमातून आपण त्यावर प्रकाश टाकणार आहोत. जेणेकरून तळागाळातल्या लोकांनाही स्टार्टअप बद्दल पुरेपूर माहिती मिळेल आणि त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. की स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी नेमकं काय केलं पाहिजे? एवढंच नव्हे तर पहिल्या दिवसापासून काय प्रयत्न करायला पाहिजे? कारण एखादी संकल्पना आपल्या डोक्यात असते, मात्र ती किती दिवस डोक्यात राहणार आहे? आपल्याला काही ना काही कारणाने तिचं विस्मरण होणे हे नैसर्गिक आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्या दिवसापासून योग्य प्लॅनिंग करत गेले, सर्व व्यवस्थित कागदोपत्री माहिती ठेवली तर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत. त्यातल्या त्यात यामध्ये एक फायदा होतो तो म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा सर्वाधिक वाचतो.

स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि आयडिया ही फार महत्त्वाची असते. स्टार्टअपचा जो फाउंडर असतो किंवा जो उद्योजक असतो त्याचा एकच मूळ उद्देश असतो की, ‘मी निर्माण केलेल्या उत्पादनाला योग्य मार्केट मिळायला हवं.’ मग तो त्यासाठी वणवण भटकतो, आवश्यक ते प्रयत्न करतो, प्रचंड कष्ट करतो. हे त्याचे अतिरिक्त कष्ट वाचायला हवेत म्हणून शासनाने इनक्युबेशन सेंटरची निर्मिती केलेली आहे. जेणेकरून त्याला या प्रयत्नांमध्ये काहीशी मदत मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन आणि पुढील प्रक्रिया मार्गदर्शन मिळवू शकतात. मात्र ते आधी समजून घ्यावे लागेल. म्हणजे काय, तर एखाद्या आयडियाला म्हणजेच संकल्पनेला प्रत्यक्षात स्टार्टअप मध्ये रुपांतरीत करण्यासाठी इंक्युबेशन सेंटर हे तुम्हाला मदत करत असतं.

एक उदाहरण सांगतो.. साधारणपणे आपण काय करतो, सहज दुकानदाराकडे जातो त्याच्याकडून बियाणे विकत घेतो आणि ते शेतात लावून मोकळे होतो. पण काय होतं, कालांतराने ते पीकच येत नाही. मग आपण पुन्हा त्याच्याकडे जाऊन तक्रार करतो की, “अरे बाबा मी तुझ्याकडून घेतलं हे प्रॉडक्ट काहीच कामाचं राहिलं नाही.” मग तो म्हणतो “अच्छा ठीक आहे. ते चाललं नाही का? मी दुसरं देतो..” म्हणजे काय तर त्याच्याकडे संशोधनाचा अभाव आहे. त्याने दिलेलं प्रॉडक्ट हे कोणत्याही प्रकारे संशोधनातून निर्माण झालेलं नसतं. ते फक्त त्याच्या अनुभवातून त्याच्या जजमेंट मधून त्याने आपल्याला दिलेलं असतं. दरम्यानच्या काळात मी साताऱ्याला एका इनक्युबेशन सेंटरला लेक्चरला गेलो होतो. तिथे नांगरणी करण्यासाठी एक रोबोटची निर्मिती केली होती. तो रोबोट शेतामध्ये फिरायचा आणि डेटा कलेक्ट करायचा. कोणत्या भागात ओलावा आहे, कोणत्या भागात कोरडेपणा आहे, कुठे युरिया कमी आहे, कुठे फॉस्फरस कमी आहे, कुठे सल्फेट कमी आहे… इत्यादी.. मग ती माहिती जमा केल्यानंतर तो रोबोट ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घटकांची कमी आहे, तिथे ती पूर्तता करायचा. मूळ मुद्दा काय तर.. या रोबोटची आयडिया त्यांनी इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून निर्माण केली आहे.

आता एक गोष्ट या निमित्ताने अजून समजून घेऊ की, जर त्यांनी हे प्रॉडक्ट पेटंट केलं नसतं, तर त्यांचे किती मोठे नुकसान झालं असतं? मी आता या रोबोट बद्दल जाहीररित्या इथे तुम्हाला सांगू शकतोय यामागेही हेच मुख्य कारण आहे. कारण त्यांनी त्या रोबोटचा पेटंट स्वतःकडे घेतला आहे. त्यामुळे दुसरी कोणत्याही व्यक्ती त्यांची आयडिया चोरू शकत नाही आणि चोरली तरी त्यांना काही फरक पडणार नाही. कारण त्यांनी स्वतःचा पेटंट रजिस्टर करून घेतलेला आहे. उलट चोरणारा जास्त फसेल. याच काही महत्त्वाच्या उदाहरणांमधून तुम्ही या गोष्टी सहज समजून घेऊ शकतात. यासाठीच डीपीआयआयटी पेटंट रजिस्ट्रेशन या गोष्टी फायद्याच्या ठरत असतात. म्हणून मी आवर्जून पुन्हा पुन्हा याच गोष्टी सांगतो आहे की, डीपीआयआयटी ला रजिस्ट्रेशन हे फार गरजेचे आहे. आता साहजिक तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की, “सर तुम्ही म्हणताय डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन करायला पाहिजे.. असं करायला पाहिजे… तसं करायला पाहिजे… बरोबर..! मग तुमच्या मनात पण एक प्रश्न निर्माण झाला असेल की, आजपर्यंत कितीतरी लाख लोकांनी आपलं डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन केलं असेल.. तुमच्या मनात एक काहीतरी मोठा आकडा नक्कीच असेल.. पण मी तुमची माफी मागतो.. कारण वास्तवात आज पर्यंत फक्त ८९ हजार रजिस्ट्रेशन आजपर्यंत डीपीआयआयटीला झालेले आहेत. ही फार खेदाची बाब आहे. याचा अर्थ काय तर, लोक स्टार्टअपची निर्मिती करत आहेत; पण डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन करत नाही, जे खरंच फार चुकीचं आहे.. त्यामुळे जर कोणी म्हटलं की, ‘तू स्टार्टअप सुरू करतोय तर कर.. पण रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही..’ तर त्याकडे कृपया दुर्लक्ष करा… तुमचा जो काही गोंधळ असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर शासकीय अधिकृत केंद्रात म्हणजेच इनक्युबेशन सेंटर किंवा महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी या अधिकृत ठिकाणीच तुम्ही योग्य ती विचारपूस करून पुढे जायला हवं.
तर मित्रांनो, कुणाच्या सांगण्याने किंवा कुणाच्या दोन गोष्टी चुकीच्या ऐकून चुकीचे निर्णय घेऊ नका.

अधिकृत ठिकाणीच योग्य ती माहिती मिळवा, हाच आमचा ही स्टार्टअप सिरीज तुमच्या समोर आणण्यामागचा मूळ उद्देश आहे. लोकांना या माध्यमातून आम्हाला जागृत करायचा आहे. तुमच्या नवनवीन कल्पनांना आम्हाला पंख द्यायचे आहेत. त्यांना बळकट करायचा आहे. तुम्हाला नवीन ज्ञान द्यायचा आहे. ज्यामुळे तुम्ही स्वतःचा, तुमच्या गावाचा विकास करू शकाल आणि तुमच्या विकासात काहीसा वाटा आमचाही राहील. पुन्हा एकदा शेवटचं सांगेल की, कोणत्याही स्टार्टअपला जादूची कांडी समजू नये. त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य अभ्यासातून समजून घ्या, त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करा, अधिकृत ठिकाणांवरूनच माहिती मिळवा, डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन करा, सोबतच तुमच्या स्टार्टअप संबंधात पहिल्या दिवसापासून योग्य प्लॅनिंग करा आणि आपला स्टार्टअप यशस्वी करा..

वर सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त स्टार्टअपसाठी कोणताही कायदा, कोणताही शासन आदेश, कोणतीही अतिरिक्त माहिती उपलब्ध नाही.. फक्त डीपीआयआयटीचं रजिस्ट्रेशन गरजेचा आहे. जी काही तुम्हाला माहिती हवी असेल ती तिथेच तुम्हाला मिळेल. या पलीकडे कुठेही काही ऐकून किंवा वाचून तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका. एक स्टार्टअप मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही स्टार्टअपची निर्मिती करा. तुमच्या स्टार्टअप संबंधात डीपीआयआयटीला रजिस्ट्रेशन करून त्यांच्या नेमून दिलेल्या गोष्टींप्रमाणे अधिकृतरीत्या वाटचाल करा आणि आपला स्टार्टअप विकसित करून स्वतःचा हा विकास घडवा..

पंकज दारा
ग्लोबल स्टार्ट अप मेंटॉर
9823354105
[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.