धक्कादायक : ठाकरे गट युवासेना प्रमुखाची निर्घृण हत्या

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील सरकारनगर परिसरमधून समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

पोलीस बंदोबस्तात वाढ

दरम्यान युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

3 संशयित आरोपी ताब्यात

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हत्येप्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही संशयित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे.  स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहे. सोबतच या हत्येमागील नेमके कारण काय, याचा देखील पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.