कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदतीचे केले आवाहन…

0

 

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून ‘एक हात मदतीचा’ या मदत फेरीद्वारे १० हजार रुपयांची मदत पालकांच्या स्वाधीन केली आहे.

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकणारा विष्णू गणेश कुमावत हा हिवरखेडा (ता.जामनेर) येथील विद्यार्थी शनिवारी दुपारी ३ वाजता पिंपळाची फांदी डोक्यात पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास जळगाव येथेच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून तिथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या ५ दिवसांपासून तो बेशुद्धावस्थेत असून डॉक्टर त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे मदतीसाठी देऊन शिक्षकांच्या सहकार्याने तसेच गावातून, बस स्थानक परिसरातून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवून माणुसकीचे दर्शन घडविले. या उपक्रमाद्वारे १० हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून सदर निधी जखमी विष्णूचे वडील गणेश कुमावत यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

जखमी विष्णूची घरची परिस्थिती हालाखीची असून आई आणि वडील शेतमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अचानक आलेले हे संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ मदत करत आहेत.

विष्णू गणेश कुमावत या विद्यार्थ्याच्या उपचारासाठी दात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.