खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

0

 

लोकशाही विशेष लेख

 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील कुरबुरीने त्यांच्यात असलेले मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेवर असताना मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या कलगीतुरा होत असे, हे काही नवीन नाही. अगदी गिरणा नदीतील अवैध वाळू उपसा मंत्री गुलाबराव पाटलांना पाळधीला जाताना येताना दिसत नाही का? असा आरोप खासदार उन्मेष पाटलांनी केला होता. त्यावेळी एकमेकांवर कोणत्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले होते, हे जळगाव जिल्ह्यातील जनता विसरलेली नाही. त्यातून खासदार उन्मेष पाटलांनी गिरणा बचाव परिक्रमा केली. गिरणा नदीतील अवैध वाळूचा उपसा संदर्भात गिरणेकाठावरील गावांमध्ये जाऊन लोकप्रबोधन केले. गिरणा बचाव प्रक्रिया हा एक आगळावेगळा उपक्रम खासदार उन्मेष पाटलांनी केला असला तरी त्याला म्हणावी तशी साथ मिळालेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आता शिवसेना-भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे. तर पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री जल जीवन मिशन कार्यक्रमात खासदारांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना डावलून कार्यक्रम करत आहेत, असा आरोप खासदार उन्मेष पाटलांनी केल्याने शिवसेना-भाजप मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. खासदार उन्मेष पाटील यांचे म्हणणे आहे की, जल जीवन मिशन योजना ही केंद्र शासन आणि विशेषता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजना असून त्याला केंद्र शासनामार्फत केंद्र शासनातर्फे अर्थसहाय्य मिळते. त्यामुळे या जलजीवन मिशनच्या व्यापक दृष्टीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यात सर्वांना सामावून घेणे आवश्यक आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केलेले त्यांचे विचार व्यापक आहेत. या योजनेचा लाभ भाजपाला मिळणे आवश्यक आहे. यात खासदार उन्मेष पाटलांच्या म्हणण्यात काही चुकीचे आहे, असे वाटत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अद्याप खासदार उन्मेष पाटलांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिलेले नाही, अथवा त्याबाबत त्यांचे म्हणणे ही व्यक्त केलेले नाही. एकंदरीत जसजशा निवडणूका जवळ येत आहे. तस तशी प्रकारची नेत्यांमधील धुसफूस सुरू राहील. अशा प्रकारामुळे कार्यकर्त्यांची मात्र करमणूक होते.

 

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी खासदारकीच्या तिकिटाचे जे नाट्य झाले, त्यात माजी आमदार स्मिता वाघ यांना जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द झाल्याने स्मिता वाघ आणि तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष स्मिता वाघ यांचे पती कै. उदय वाघ यांच्यावर फार मोठा अन्याय झाला. अचानक खासदार उन्मेष पाटलांची उमेदवारी जाहीर झाली आणि मोदी लाटेत खासदार उन्मेष पाटलांना सर्वाधिक मते जळगाव लोकसभा मतदारसंघात मिळाली. तरुण तडफदार उन्मेष पाटलांचे खास मित्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर गेली चार वर्षे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने जिल्ह्यात घोडदौड सुरू केली. जिल्हा दूध संघ निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन दोन्ही मंत्र्यांच्या सहकार्याने संघ ताब्यात घेतला. त्यांची बक्षिशी मंगेश चव्हाण यांना दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या रूपाने मिळाली. जिल्हा बँकेतील सत्ता खेचून आणण्यात सुद्धा मंगेश चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. हे सर्व करत असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांविषयी कधीही उलट सुलट काहीही न करता त्यांची मर्जी राखून मंगेश चव्हाण कार्य करतात. उलट खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण हे एकमेकांचे जिवलग मित्र असताना त्यांच्यातील मतभेद मात्र चव्हाट्यावर आले आहेत. चाळीसगाव येथील एका शिक्षक संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे दिसून आले. तरीसुद्धा आमदार मंगेश चव्हाण यांचे कडून खासदार उन्मेष पाटील यांचे विरुद्ध जाहीर वक्तव्य केलेले दिसून येत नाही. आमदार मंगेश चव्हाण यांची ही स्ट्रॅटेजी खासदार उन्मेष पाटलांनी लक्षात घेतली तर अंतर्गत धुसफूसीमुळे विकास कामावर परिणाम होणार नाही. म्हणून युती धर्म पाळून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे संदर्भात संवादाने प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी जाहीर वक्तव्य करून आपापसात कटूता वाढवण्याचे कारण नाही. हा प्रश्न खासदार उन्मेष पाटील यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडून आपली व्यथा व्यक्त केली असती, तरी प्रश्न मार्गी लागली असता एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.