इच्छुकांच्या वाढत्या संख्येने भाजप श्रेष्ठींना ‘ताप’!

बंडाळी होण्याची शक्यता : उद्याच्या बैठकीकडे लक्ष

0

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची वाढती संख्या भाजप श्रेष्ठींसाठी तापदायक ठरत असून बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या दि. 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवड समितीची बैठक होत असून या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

जळगाव जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला असून येथे भाजपाचे संघटन चांगले आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश सोहळे झाले असल्याने इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. जळगाव मतदारसंघात ही यादी मोठी असल्याने येथे इच्छुकांची मनधरणी करण्यात श्रेष्ठींची कसरत होणार आहे. रावेर मतदारसंघातही अनेक इच्छुक संपर्क अभियानावर भर देत असल्याने तेथेही मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. गुरुवार दि. 29 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत होत असून या बैठकीत संभाव्य उमेदवारांबाबत सखोल चर्चा होणार आहे. मोदी-शहांची जोडी धक्का देणार असून कुणाला संधी मिळते याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे.

बंडाळी होण्याची शक्यता अधिक
भाजपात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पक्षात बंडाळी होण्याची शक्यताच अधिक आहे. जळगाव मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, रोहित निकम, दिलीप रामू पाटील यांची नावे चर्चेत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासह अमोल जावळे, डॉ. केतकी पाटील, श्रीराम पाटील, साधनातार्इ महाजन यांची नावे पुढे येत आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षश्रेष्ठी कमालीचे घामाघूम झाले आहेत.

ठाकरे गटाची जळगावसाठी धडपड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जळगाव मतदारसंघांची चाचपणी सुरु झाली असून ते येथे उमेदवार देण्याची तयारी करीत आहेत. माजी खासदार ए.टी. पाटील यांना गळाला लावून त्यांना पुढे करण्याची शक्यता अधिक आहे. ठाकरे गटाचे या मतदारसंघात चांगले नेटवर्क असल्याने ते उमेदवारीसाठी महाआघाडीत धडपड करीत आहेत.

काँग्रेसला रावेरात उमेदवार गवसेना
रावेर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असून तेथे पक्षाचे आमदारही आहेत. भाजपाला धडक देणारे डॉ. उल्हास पाटील हेच भाजपात गेल्याने काँग्रेसला या मतदारसंघात उमेदवार गवसेना झालेला आहे. काँग्रेसला तगडा उमेदवार मिळणार की नाही यात शंकाच आहे.

बैठकीकडे विद्यमान खासदारांचे लक्ष
भाजपाच्या केंद्रीय निवड समितीची गुरुवार दि. 29 रोजी महत्त्वपूर्ण बैठक होत असून यात उमेदवार निश्चितीची शक्यता असल्याने विद्यमान खासदारांसह इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.